ठाणे - जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाची रिपरिप पहाटेपर्यत सुरु असतानाच त्याचवेळी महामार्गावरून जाणाऱ्या एका भल्यामोठ्या एचपी गॅस टँकर पलटला. टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने गॅसने भरलेला टँकर महामार्गाचे लोखंडी कठडे तोडून चार-पाच पलट्या घेत शेतात जाऊन उलटल्याने गॅस गळतीच्या भीतीमुळे महामार्गावर घबराट पसरली आहे.
ही घटना भिवंडी तालुक्यातील पिंपळास गावानजीक नाशिक-मुंबई महामार्गावर सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
महामार्गाचे लोखंडी कठडे तोडून चार-पाच पलट्या घेत शेतात जाऊन गॅस टँकर उलटल्याने त्यापाठोपाठ मागेच असलेला एक भंगार कंटेनर व ट्रक पलटी झाला होता. यामुळे नाशिक-मुंबई महामार्गावर नाशिकच्या दिशेने वाहतूक तासभर ठप्प झाली होती. तर रस्त्यावर पटली झालेले कंटेनर व ट्रक वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने बाजूला करून वाहतूक कोंडी ३ तासात सुरळीत केली आहे. मात्र अद्यापही स्थानिक कोनगाव पोलीस व वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल असून पलटी झालेल्या गॅस टँकर भरलेला असल्याने गॅस गळती होण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर गॅस टँकर घटनास्थळावरून हलविण्यात यावा, अशी मागणी परिसरातील स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही