ठाणे - कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारी याला उल्हासनगर पोलिसांनी आज (गुरुवार) ताब्यात ( Gangster Suresh Pujari Arrested Ulhasnagar Police ) घेतले. सचानंद करिरा उर्फ सचू केबलवाला यांची हत्या आणि उल्हासनगर मधील अनेक व्यापाऱ्याकडून खंडणी प्रकरणात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
विविध पोलीस ठाण्यात ३७ गंभीर गुन्ह्यांची नोंद - ऑक्टोंबर २०२१ रोजी कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपिन्समध्ये मुंबईच्या एटीएस पथकाने अटक केली होती. त्याच्यावर ठाणे व मुंबई शहरातील विविध पोलीस ठाण्यात ३७ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी विविध पोलीस ठाण्यात प्रक्रिया सुरु आहे. गँगस्टर रवी पुजारी पासून वेगळे होऊन सुरेश पुजारीने ८ ते ९ वर्षांपूर्वी स्वत:ची टोळी निर्माण केली. सुरेश पुजारी हा यापूर्वी उल्हासनगर मधील विश्वास ढाब्यावर नोकरी करत होता. तो घाटकोपर येथील असल्फा व्हिलेज येथे राहात होता. तेथूनच त्याने गुन्हेगारी सुरू केली होती. त्यानंतर नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे, कल्याण, उल्हासनगर येथील डान्सबार मालकांकडे खंडणीचे सत्र सुरु केले होते.
सचानंद करिरा यांची २०१५ साली हत्या - सुरेश पुजारीच्या गुंडांनी उल्हासनगर मधील केबल व्यावसायिक सचानंद करिरा यांची २०१५ साली त्यांच्या कार्यालयात घुसून हत्या केली होती. करिरा यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यत १२ जणांना अटक करून त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच हत्येप्रकरणी आज सुरेश पुजारीला उल्हासनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड याप्रकरणी चौकशी करणार आहेत.
हेही वाचा - Home Minister Dilip Walse Patil PC : 'शरद पवारांच्या राजकीय आणि सामाजिक भूमिका वर्षानुवर्ष लोकांना माहिती'