ठाणे- सर्वत्र गणेशोत्सवाची धामधुम सुरु आहे. सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये निरनिराळ्या सजावटी करण्याकडे गणेश मंडळ कार्यकर्त्यांचा कल असतो. भिवंडी शहरातील चांदमल करवा कंपाऊंड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळही प्रत्येक वर्षी निरनिराळ्या संकल्पनेतून गणेश मुर्ती साकारण्याचा प्रयत्न करत असते. यंदा त्यांनी 11 हजार विविध बिस्कीट पाकिटांपासून सुंदर गणेश मुर्ती आणि देखावा साकारला आहे.
मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक मुरलीधर हेडा, रमेश हेडा, मोहन राठी यांच्या नेत्तृत्वाखाली मंडळाचे युवक कार्यकर्ते यांनी विविधरंगी बिस्कीट पाकिटांपासून ही गणेश मूर्ती साकारली आहे. यापूर्वी पुस्तकांचा गणपती, शालेय साहित्य गणपती, अलंकार गणपती, सुकामेवा गणपती, मातीच्या दिव्यांचा गणपती, क्रीडा साहित्य गणपती, वाद्य साहित्य गणपती, अशा मुर्ती त्यांनी साकारल्या असून या माध्यमातुन जनजागृती करण्याचा मंडळाचा प्रयत्न असतो.
या मंडळाचे प्रत्येक वर्षी आगळ्यावेगळ्या प्रतिकृती, देखावे उभे करत असताना ते पर्यावरण पुरक कसे राहतील याकडे जाणीवपूर्वक लक्ष असते. यातून युवा पिढीला आपली संस्कृती दाखविण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळेच या कलाकृतीला पाहण्यासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत.