ठाणे - मुरबाड-कल्याण महामार्गावरील सोनारपाडा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुरबाड शाखा येथील एटीएममधून सुमारे ४६ लाखांची रोकड लंपास करणाऱ्या चौकडीला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक मदतीच्या साहाय्याने कल्याणातून अटक केल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिली आहे.
चोरट्याकडून ४० लाखांची रोकड हस्तगस्त
मुरबाड-कल्याण महामार्गावरील सोनारपाडा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या २४ मार्च रोजी एटीएममधून ४६ लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची बँकेच्या मॅनेजर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून २ संशयितांना ताब्यात घेतले होते. अधिक तपास केला असता अन्य २ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या कडून चोरलेली ४० लाखांची रोकड हस्तगत केली आहे.
एटीएममध्ये रक्कम टाकण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा सहभाग
एटीएममधून सुमारे ४५ लाख ९८ हजार २०० रुपये या चोरट्यांनी २४ मार्चच्या मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास लंपास झाले होते. ही घटना २४ मार्च रोजी सकाळी बँकेच्या कर्मचाऱ्यांना लक्षात आली. या बाबत स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद नोंदवली होती. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पो. निरीक्षक सुरेश मनोरे, पो. निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांनी विशेष तपास पथके तयार करून कोणतेही धागेदोरे हाती नसताना तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून ४ आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे या चार चोरट्यापैकी १ चोरटा बँकेच्या एटीएममध्ये रक्कम भरण्याचे काम करीत असल्याने त्याला एटीएम मशीनमधून रक्कम काढणे व टाकणे अवगत होते. शिवाय तो कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे त्याने तीन साथीदारांच्या मदतीने चोरीचा प्रकार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
अन्य दोन-तीन एटीएम फोडण्याचा आरोपींचा प्रयत्न
या चोरट्यांकडून आतापर्यंत चोरीस गेलेली ३९ लाख ६९ हजार ७०० रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे या आरोपींनी अन्य दोन-तीन एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात समोर आले असून त्याचा शोध पोलिसांनी सुरू केल्याने आरोपींची नावे गुपित ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याच्या तपासात मुरबाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने, पोलीस उपनिरीक्षक विकास निकम, तोडकरी,निंबाळकर, सहायक फौजदार आर. तडवी, पो. हवा. डोईफोडे कुळगाव पोलीस ठाण्यातील सहा. पोलीस निरीक्षक संदीप निगडे त्यांचे तपास पथक, टोकावडे पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे आदींनी तपास कामी अत्यंत महत्त्वाची कामगिरी केल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिली आहे.