ठाणे - भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील वंजारपट्टी नाका ते चाविंद्रा मार्गावरील पटेलनगर परिसरातील निष्कृष्ट रस्ते अपघाताचे केंद्रबिंदू ठरत आहेत. या मार्गावर काँक्रिटीकरणाचा रस्ता अरुंद असल्याने लगतच पेवर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. यामुळे एकच ठिकाणी चार दुचाकी चालकांचा अपघात झाला आहे. विशेष म्हणजे या चारही अपघाताच्या घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. दुसरीकडे दरदिवशीच या ठिकाणी अपघात होत असल्याने नागरिक जीव मुठीत घेऊन वाहने चालवत आहेत. मात्र भिवंडी पालिका प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अपघातग्रस्त नागरिकांनी केला आहे.
गॅपमुळे अपघाताची मालिका
भिवंडी शहरातील पटेलनगर परिसरात काही वर्षांपूर्वी सिमेंट काँक्रिटीकरणाचा रस्ता बनविण्यात आला. मात्र हा रस्ता अरुंद असल्याने लगतच पेवर ब्लॉक बसवण्यात आले आहे. यामुळे रस्त्यांमध्ये चढ-उतार होऊन गॅप तयार झाला आहे. याच रस्त्यावर पडललेल्या गॅपमुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांचा घसरून अपघात होत आहे. ही अपघाताची मालिका रोखण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा पालिका प्रशासनाकडे तक्रारीदेखील केल्या. मात्र महानगरपालिकेने याकडे अक्षरशः दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
पावसाळा संपल्यानंतर दुरुस्ती
विशेष म्हणजे ज्या प्रभागात हा रस्ता बनविण्यात आला, तो प्रभाग महापालिकेच्या उपमहापौर इम्रानवली मोहम्मद खान यांचा आहे. जर उपमहापौरांच्या प्रभागातच नागरिक सुरक्षित नसतील तर इतर नगरसेवकांच्या प्रभागातील समस्या काय असाव्यात, असा प्रश्न पडतो. या रस्त्याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले, की पावसाळा संपला की या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. परंतु तोपर्यंत रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती का करण्यात येत नाही, असा सवाल नागरिकांना पडला आहे.
एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहेत का?
भिवंडी महापालिका प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? या अपघातात एखाद्याचा बळी गेल्यानंतर हे रस्ते दुरुस्त करण्यात येतील का, असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. मात्र या गंभीर प्रश्नांबाबत पालिका प्रशासन मात्र डोळे झाकून अपघाताची मालिका पाहात असल्याचे दिसून आले आहे.