ठाणे - जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नातवाला अपघाताच्या वादातून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या तळवली गावाच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या नीलेश देसलेसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संकल्प संजीव नाईक, असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून तो माजी खासदार संजीव नाईक यांचा मुलगा आहे.
कारच्या मागे दुचाकीस्वार येऊन धडकला अन् वाद झाला
माजी मंत्री गणेश नाईक यांचे नातू संकल्प संजीव नाईक व त्यांचे मित्र तेजेंद्रसिंग हरजितसिंह मंत्री (वय २४) हे दोघे कृषीकेंद्र शोधण्यासाठी काल सायंकाळच्या सुमारास कल्याण-नगर राष्ट्रीय महार्गावरील माळशेज घाटाच्या दिशेने कारने जात होते. त्याच सुमाराला तळवली गावाजवळ येताच तेथून त्यांनी त्यांची कार पुन्हा यूटर्न घेताना त्याचवेळी त्याच्या कारच्या मागे एक दुचाकीस्वार येऊन धडकला. या अपघातात तो दुचाकीवरून खाली पडला. त्यामुळे संकल्प नाईक व त्यांचे मित्र हे दोघे कारमधून खाली उतरले व त्या दुचाकीस्वाराला उचलले. नाव विचारले असता त्यांनी प्रवीण रघुनाथ लिहे असे नाव सांगितले. त्याचवेळी हनुमान हॉटेल येथे असणारा मुलगा नीलेश देसले व त्याच्यासोबत असणारे तीन साथीदार यांनी संकल्प नाईक व त्यांचा मित्र यांच्याशी अपघाताच्या कारणावरून वाद घालून शिवीगाळ करीत जबर मारहाण केली.
तक्रादाराच्या गळ्यातील सोनसाखळी गहाळ
सदर घटनेत तक्रारदार तेजेंद्रसिंग मंत्री यांच्या गळ्यातील सव्वा तोळ्याची सोन्याची चेन गहाळ झाली आहे. या प्रकरणी नीलेश देसलेसह तिघांवर गुन्हा दाखल केला असून इतर तिघांचा तपास सुरू आहे. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२३, ५०४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.