ठाणे - कळव्यातील पारसिकनगर, घोलाईनगर येथील वनजमिनीवरील अतिक्रमणाला विरोध करणाऱ्या वनपाल समीर इनामदार आणि अजरून निचिते यांच्यासह 3 जणांवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर संचारबंदी असल्यामुळे वनजमिनीवर कुठेही अतिक्रमण होऊ नये, यासाठी ठाणे वनविभागाने प्रत्येक क्षेत्रात दिवसाआड गस्तीचे नियोजन केले आहे. 28 मे रोजी दुपारी कळवा येथील वनपाल समीर इनामदार, वनपाल अजरून निचिते आणि वनमजूर सचिन म्हात्रे यांचे पथक दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गस्त घालीत होते. त्यावेळी काही नागरिक या भागात बांधकाम करत असल्याची बाब या पथकाच्या निदर्शनास आली. त्यांनी या अतिक्रमणाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बारकू पवार या अतिक्रमण धारकासह 3 जणांनी निचिते यांच्यासह बाकीच्यांवर दगडफेक करत हल्ला केला. यात निचिते यांच्या डोक्याला तर इनामदार यांच्या हाताला जबर मार लागला.
वनमजूर म्हात्रे हे देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. या तिघांवरही कळव्यातील मनिषा नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी कळवा रुग्णालयात बारकू पवार याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.