ठाणे - एका बेरोजगार तरूणाला नोकरीचे आमिष दाखवून दोन डॉक्टरांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने त्या तरुणाला १० लाख २० हजाराचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन डॉक्टरांसह चौघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. जितेंद्र, डॉ. शिल्पा, विनोद व फारूख असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ पूर्व येथील शिवगंगानगर परिसरात रमेश पाटील (वय.६८) हे राहतात. सन २०१५ ते सन २०१९ या दरम्यान त्यांचा मुलगा सिध्दांत याला पी. डब्ल्यू. डी विभाग व मध्य रेल्वेत टिकीट चेकर म्हणून नोकरीला लावण्याचे आरोपी डॉ. जितेंद्र, डॉ. शिल्पा, विनोद व फारूख या चौघांनी आमिष दाखवले होते. या चारही आरोपींनी आपसात संगनमत करून प्रथम ८ हजार ५०० रूपयाचा धनादेश पाटील यांच्याकडून घेतला. त्यानंतर ९ लाख ३५ हजाराची उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने पाटील यांच्याकडून मागून घेतली. मात्र, बराच कालावधी उलटूनही त्यांच्या मुलाला आरोपीने नोकरी न लावता त्यांची १० लाख २० हजाराची फसवणूक केली. या प्रकरणी पाटील यांनी केलेल्या तक्रार अर्जावरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्या चौघांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.