मुंबई - जगभरात भीती निर्माण करणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने दोन दिवसांपूर्वी कर्नाटकात प्रवेश केला होता. त्यानंतर आता या विषाणूने महाराष्ट्रातही शिरकाव (Omicron Variant In Maharashtra) केला आहे. ओमायक्रॉन विषाणूचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये आढळून (Omicron Patient Found In kalyan Dombivali) आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट (Corona omicron virus) सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे.
ओमायक्रॉन व्हेरीयंटचा पहिला रुग्ण -
महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरीयंटचा पहिला (First Patient In kalyan Dombivali) रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये २४ नोव्हेंबर २०२१ रोजी सापडला होता. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे.
निकटसहवासितांचा शोध सुरू -
या रुग्णाच्या १२ अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि २३ कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. याशिवाय या तरूणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला, त्या विमान प्रवासातील २५ सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत. या शिवाय आणखी निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
पुण्यातील रुग्णात ओमायक्रॉन नाही -
या दरम्यान झांबिया देशातून पुणे येथे आलेल्या ६० वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून या रुग्णामध्ये ओमायक्रॉन आढळलेला नाही तथापी डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळून आलेला आहे.
३८३९ प्रवाशांची आरटीपीसीआर -
आज सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिजोखमीच्या देशातून आलेल्या सर्व ३८३९ प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली असून इतर देशांमधून आलेल्या १७,१०७ प्रवाशांपैकी ३४४ प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरील तपासणीत १ डिसेंबर पासून आतापर्यंत ८ प्रवासी कोविड बाधित आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या शिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचेदेखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे.
नागरिकांनी भीती बाळगू नये -
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.
काय आहे जिनोम सिक्वेन्सिंग ?
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात विषाणूंचे जिनोम सिक्वेन्सिंग म्हणजेच, जनुकीय सूत्र निर्धारण वैद्यकीय प्रयोगशाळा (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेन्सिंग लॅब) स्थापन करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दिनांक ४ ऑगस्ट २०२१ रोजी त्याचे लोकार्पण करण्यात आले होते. यानंतर सदर यंत्रणा वैद्यकीय दृष्ट्या प्रमाणित होवून कार्यान्वित करण्यात आली आहे. अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीने, अमेरिकेतीलच अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप (ए.एस.जी. बोस्टन) या संस्थेच्या माध्यमातून एकूण ६ कोटी ४० लाख रुपये किंमतीचे हे २ जिनोम सिक्वेन्सिंग संयंत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला दान स्वरुपात दिले आहे. विषाणूंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्याने एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो. असा फरक ओळखू आल्यानंतर उपचार पद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होते. कस्तुरबा रुग्णालयातील जिनोम सिक्वेन्सिंग लॅबमध्ये एकाचवेळी सुमारे ३८४ वैद्यकीय नमुन्यांची तपासणी होऊन ४ दिवसांच्या आत वैद्यकीय निष्कर्ष प्राप्त होऊ शकतात.
हेही वाचा - Omicron Symptoms and Precautions : ओमायक्राॅन महाराष्ट्रात, जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारीचे उपाय