ठाणे - शहर व जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे चिन्हे दिसत नसतानाच दुसरीकडे मात्र, नागरिक आणि दुकानदार खबरदारीचे सर्व उपाय धाब्यावर बसवताना दिसत आहेत. अशा सर्व नियम मोडणाऱ्यांविरोधात प्रशासनाने दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. कोपरी नौपाडा प्रभाग समिती सहआयुक्त प्रणाली घोंगे यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. नियम मोडणाऱ्यांना आता थेट पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार असून याची पावती देखील दिली जात आहे.
हेही वाचा - भिवंडीत पुन्हा अग्नितांडव; मण्यांचा कारखाना जळून खाक
आज ठाणे स्टेशन रोड आणि मार्केट परिसरात पालिकेचे अधिकारी आपल्या पथकासह निघाले व त्यांनी नियमांची पायमल्ली करणाऱ्या नागरिक आणि दुकानदारांना चांगला धडा शिकवला. मास्क न वापरणारे, सोशल डिस्टनसिंगचे पालन न करणारे यांना जागीच दंड ठोठावून पावत्या देण्यात आल्या. या धडक कारवाईमुळे काही तासांतच पालिकेच्या तिजोरीत तब्बल पंधरा हजार रुपये जमा झाले. प्रणाली घोंगे यांनी पदभार सांभाळून या प्रभाग समितीत उल्लेखनीय कामगीरी केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा - नेपाळी तरुणाची ठाण्यात हत्या; १० ते १२ जणांच्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल
पालिकेला मिळाले अर्थसहाय्य
ठाण्यात महापालिका हद्दीमध्ये १२ सप्टेंबर २०२० ते २८ सप्टेंबर २०२० या कालावधीत विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या एकूण १०१५ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतंर्गत एकूण ५ लाख ७ हजार ५०० रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये ७० हजार दंड वसूल करण्यात आला. वर्तकनगरमधून ३८ हजार तर लोकमान्यनगर-सावरकर प्रभाग समितीमधून ३५ हजार दंड वसूल करण्यात आला. वागळे प्रभाग समितीमधून ४७ हजार, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतंर्गत १ लाख २० हजार तर कळवा प्रभाग समितीमधून ३३ हजार ५०० एवढा दंड वसूल करण्यात आला. मुंब्रा प्रभाग समितीमध्ये या कारवाईमध्ये एकूण ८१,७०० एवढा दंड वसूल केला तर दिवा प्रभाग समितीमध्ये एकूण २४,०००एवढा दंड वसूल करण्यात आला.