ठाणे - उत्तर प्रदेशचा कुख्यात गुंड विकास दुबे याचा आज उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटर केला. अनेक दिवसांपासून स्पेशल टास्क फोर्स आणि उत्तर प्रदेश पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर काल त्याला अटक करण्यात आली; आणि मध्य प्रदेशातील उज्जैमधून माघारी आणत असताना त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. या प्रकरणानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
हा संपूर्ण प्रकारच बनावटी असल्याचा खुलासा एन्काऊंटर स्पेशालिस्ट रवींद्र आंग्रे यांनी केला आहे. आपण 53 एन्काऊंटर केले, त्यात अनेकदा उत्तर प्रदेशात जाऊन आरोपीना पकडून आणले होते. मात्र ज्या ज्या वेळी पोलीस येत असल्याची बातमी स्थानिक पोलिसांना मिळाली. त्या त्या वेळी आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. यावरून तेथील परिस्थिती स्पष्ट होते, असे ते म्हणाले.
विकास दुबेसारखा नराधम मारला गेल्याचा आनंद असला, तरीही त्याच्या एन्काऊंटरबाबत साशंक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एन्काऊंटर कसा केला जातो, याचा उलगडा त्यांनी केलाय.
दुबेचा खात्मा
मागील आठवड्यात विकास दुबेला एका प्रकरणात अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस फोर्सवर त्याच्या गुंडांनी गोळीबार केला. यामध्ये आठ पोलीस कर्मचाऱ्यांसह एक पोलीस उपअधीक्षक देखील ठार झाले. यानंतर दुबेला पकडण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. तसेच पोलिसांची विविध पथके त्याच्या मागावर होती. अखेर मध्यप्रदेशच्या उज्जैनमध्ये एका महाकाली मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर त्याला सापळा रचून पकडण्यात आले. यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी त्याला कानपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. उत्तर प्रदेशच्या न्यायालयात त्याला हजर करण्यासाठी नेत असताना पोलिसांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला. यावेळी दुबेने पोलिसांकडील बंदुक हिसकावून गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याला सरेंडर करण्याचे सांगितले. मात्र तसे न झाल्याने दुबे एन्काऊंटरमध्ये मारला गेला.