ठाणे - मार्च अखेरीस सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य मानसांच्या जीवाचे हाल सुरू आहेत. सर्वच थरातील नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर आधारित असलेल्या ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती देखील बिकट झाली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने आपल्या विविध बँकेत असलेल्या ठेवी मोडून खर्च भागवण्यास सुरुवात केली आहे. ठाणे महापालिकेला या एफडी मोडल्याने मिळणाऱ्या व्याजाला मुकावे लागणार आहे.
एकीकडे आर्थिक वर्षाचा अंत, त्याच काळात सुरू झालेला लॉकडाऊन आणि आर्थिकमंदी यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी मार्च अखेरिस भरला नाही. त्यामुळे मागील वर्षाची अखेरची तिमाही आणि या वर्षाची सुरवातीच्या तिमाहीत उत्पन्न मिळाले नाही. त्याचा परिणाम महापालिकेच्या सर्व कामावर झाला आहे. सर्व विकासकामे बंद असून शेकडो करोडो रुपये बिल देणे प्रलंबित आहे. त्यामुळे काही दिवासापूर्वी कंत्राटदार आंदोलन देखील करत होते. आता महापालिकेची भिस्त जीएसटीच्या येणाऱ्या पैशावर असून कोरोना संकट गेल्यावर महापालिकेला आर्थिक उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
ठाणे महापालिकेचे वेगवेगळे विभाग असून त्यांना प्रत्येक आर्थिक वर्षात उत्पन्नाचे उद्दिष्ट ठरवून दिलेले असते. परंतु यातील काही विभाग निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचे या पूर्वी दिसून आले आहे. त्यात आता कोरोना आणि लॉकडाऊनची भर पडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु असून सर्व व्यवहार बंद आहेत. परिणामी महापालिकेच्या तिजोरीत शून्य रुपये जमा झाले आहेत. या संदर्भात मागील अनेक दिवसांपासून ईटीव्ही भारतने महापालिका प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र महापालिकेने आपली आर्थिक स्थिती सांगण्यास नकार दिला.
गेल्या वर्षी महापालिकेचे एकूण उत्पन्न हे २४०० कोटींचे होते. तर गेल्या वर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यात ठाणे महापालिकेला २७७.३५ कोटी उत्पन्न मिळाले होते. तर ठाणे महापालिकेच्या २२५ कोटींच्या ठेवी होत्या. यामध्ये ठाणे महापालिकेला ६ टक्के व्याजदर मिळत असल्याने व्याजापोटी महापालिकेला १० ते १२ कोटी वार्षिक उत्पन्न मिळत होते. मात्र आता या ठेवी पगारासाठी वापरण्याचे नियोजन करण्यात आल्याने या व्याजदराला मुकावे लागणार आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांनी मालमत्ता आणि पाणीपट्टीमधून मिळणाऱ्या वसुलीवर काही प्रमाणात महापालिकेची परिस्थिती सुधारेल अशी महापालिका प्रशासनाला आशा आहे.
गेल्या आर्थिक वर्षात मिळालेले एकूण उत्पन्न २४०० कोटी
गेल्या वर्षी एप्रिल ते जूनपर्यंतचे उत्पन्न - २७७.३५ कोटी
यावर्षी एप्रिल ते जूनपर्यंतचे उत्पन्न - २२५ कोटींच्या ठेवीचे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी नियोजन २२५ कोटींच्या ठेवीवरील १० ते १२ कोटींचे व्याजाला मुकावे लागले.
गेल्या वर्षी तीन महिन्यातील विभागवार मिळालेले उत्पन्न
शहर विकास विभाग - ९१ कोटी
पाणीपट्टी - २.९४ कोटी
मालमत्ता कर - १५२ कोटी
जाहिरात विभाग - ३.६२ कोटी
सार्वजनिक बांधकाम विभाग - ०.३६
अग्निशमन विभाग - १४.६३ कोटी
स्थावर मालमत्ता - ०.८०
घनकचरा - ०.२१
इतर विभाग - १०. ८०