ठाणे - नववर्षाचे स्वागत अनेक मंडळी मद्य घेऊन बाहेर पडून करत असतात. आज सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त रस्त्यावर आहे. मद्यपींवर मोठ्या प्रमाणात कारवाई ठाणे पोलीस करीत आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २५ डिसेंबरपासून मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई ठाणे वाहतूक विभाग करत आहे.
सहप्रवाशांवरदेखील कारवाई
कारवाईदरम्यान श्वासविश्लेषक यंत्राचा वापर करण्यात येत असून करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक तपासणीनंतर प्लास्टिक नळी बदलून ती नष्ट केली जात आहे. त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे कारवाईदरम्यान ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात जागोजागी पोलीस कर्मचारी हे पीपीई किट घालून ही कारवाई करीत आहे. त्याचबरोबर दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या व्यक्तीच्या सहप्रवाशांवरदेखील कारवाई करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांनी दिली आहे.
उड्डाणपूल ठेवण्यात येणार बंद
ठाण्याच्या येऊर या भागात हॉटेल आणि बंगले मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी पार्ट्या होतात. यासाठी मद्यपींवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावून कारवाई करताना दिसत आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र मोठ्या प्रमाणात पार्ट्या आयोजित केल्या जातात. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण लॉन, फार्महाउस, हॉल घेऊन जल्लोष करतात व त्यानंतर दारूच्या नशेत गाड्या चालवल्याने अनेक अपघात होवून नाहक बळी जातात. यासाठीदेखील ठाण्यातील काही उड्डाणपूल बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी पर्यायी रस्ता म्हणजेच उड्डाणपुलाच्या बाजूच्या रस्त्याचा वापर करण्यास ठाणे पोलसांनी सांगितले आहे.