ठाणे - जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील अनेक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांची देखील बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नवनियुक्त आयुक्त म्हणून डॉ. विपीन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान बुधवारी शर्मा यांनी आपला पदभार स्वीकारला. त्यानंतर शर्मा यांनी महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली.
ठाणे महापालिकेचे मावळते आयुक्त विजय सिंघल यांची काही दिवसातच उचलबांगडी झाल्याने सर्वांना आश्चर्य वाटू लागले आहे. एकीकडे कोरोनाचे संकट समोर उभे ठाकले असताना अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागचे नेमके करण काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या म्हणजेच कोरोनाचे अपयश आहे का? असा सवाल केला जात आहे.
हेही वाचा... धक्कादायक...! ठाण्यात तरूणाला विवस्त्र करून मारहाण; दोन जणांना अटक
दरम्यान आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कोरोना संदर्भात माहिती घेतली. तसेच कोरोना संदर्भात लवकरात लवकर कसे नियंत्रण मिळवता येईल, याचा आढावा घेतला. येत्या दोन दिवसात संपूर्ण ठाणे शहराचा आढावा घेऊन माध्यमांशी बोलू, असे शर्मा यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र सरकार अपयशी... ठाणे पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
सरकारला कोरोनाची परिस्थिती हातळण्यासाठी यश आलेले नाही. यातूनच या बदल्या केल्या गेल्या आहेत, असा आरोप मनसे नेत्यांनी केला आहे. अशा वेळी आयुक्त बदलून काहीही होणार नाही. हे सरकारचे अपयश आहे आणि म्हणून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे.