ठाणे - ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंच्या रूपात राज्यात राजकीय भूकंप झाला. या घडाममोडीला भाजपाने साथ दिल्याची जिल्हातील राजकीय वर्तुळात चर्चेला रंगली आहे. जिल्ह्यात एकूण १८ विधानसभा मतदार संघ आहेत. यामध्ये २०१९ साली निवडणून आलेल्या आमदारांचे पक्ष बलाबल पाहता, भाजपा ८ , शिवसेना ५ , राष्ट्रवादी २, मनसे १, सपा १, अपक्ष १ असे १८ आहेत. या पैकी सेनेचे एकनाथ शिंदेंसह ( Eknath Shinde ) पाचही आमदारांनी मंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली बंड पुकारून उघड उघड भाजपाला पाठींबा दिला आहे. यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला पूर्णतः भाजपाच्या कब्जा जाणार जाणार का ? असा सवाल राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
९० सालापासून ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला : स्वर्गीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना करून मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यात स्वर्गीय आनंद दिघे यांच्या साथीने झपाट्याने ठाणे जिल्हा सेनाचा बालेकिल्ला मजबूत केला. अगदी ९० च्या दशकापासून शिवसेनेचे आमदार निवडून येत आहेत. ठाण्यातून मो. दा. जोशी पाहिल्यांदा शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. त्याआधी जिल्ह्यात काँग्रेसची सत्ता होती. मात्र ९०च्या दशकातच राममंदिराच्या मुद्द्यावर भाजपानेही ठाणे जिल्ह्यात संघटनेचे जाळे पसरवले आणि युतीच्या काळात भाजपाच्या आमदारांची संख्या वाढत गेली. आज मात्र भाजपाने गेली अडीच वर्ष राजकीय खेळी करून शिवसनेच्या एकनाथ शिंदेंना आपल्या बाजूने वळविण्यात यश्ववी झाले आहेत.
बंड करणाऱ्या पाचही आमदारांच्या घराबाहेर तगडा बंदोबस्त : सध्याच्या घडीला ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे २००४ साली पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर गेले. त्यानंतर २००९ साली जिल्ह्यात विविध विधानसभा मतदार संघाचे विस्तारकरण होऊन १८ मतदार संघ निवडणूक आयोगाने तयार केले. यामध्ये भिवंडी ग्रामीण व शहापूर अनुसूचित जमातीसाठी तर अंबरनाथ अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आले. या तिन्ही राखीव मतदार संघातून शहापूर वगळता भिवंडी ग्रामीणमधून शिवसेनेचे शांताराम मोरे आणि अंबरनाथमधून शिवसेनेचे डॉ. बालाजी केणीकर या दोघाही आमदार सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहे. हे दोन्ही आमदार सद्याच्या घडीला एकनाथ शिंदेंच्या गटात आहेत. शिवाय कल्याण पश्चिम मतदार संघातून पहिल्यांदाच निवडून आलेले सेनेचे विश्वनाथ भोईर आणि ओवला-माजीवडाचे आमदार प्रताप सरनाईक हेही शिंदेंच्या गटात सामील आहेत. या चार आमदारासह मंत्री शिंदेंच्या घराबाहरे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जिल्ह्यात भाजपाचा वाढत राजकीय आलेख : २०१४ साली जिल्ह्यात भाजपाचे ७ आमदार होते. मात्र २०१९ साली यामध्ये १ आमदारांची भर पडून सध्या ८ आमदार भाजपाचे आहेत. यामध्ये मंदा म्हात्रे ( बेलापूर ), गणेश नाईक ( ऐरोली ), संजय केळकर ( ठाणे शहर ) गणपत गायकवाड ( कल्याण पूर्व ), महेश चौगुले ( भिवंडी पश्चिम ), किसन कथोरे ( मुरबाड ) रविंद्र चव्हाण ( डोंबिवली ), कुमार आयलानी ( उल्हासनगर ) असे भाजपाचे आठ आमदार आहेत. शिवसेनेचे एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखडी ) प्रताप सरनाईक ( ओवला माजीवडा ) शांताराम मोरे ( भिवंडी ग्रामीण ) विश्वनाथ भोईर ( कल्याण पश्चिम ) बालाजी किनिकर ( अंबरनाथ ) हे पाचही आमदारांनी एकत्र येत शिवसेनेविरुद्ध बंड पुकारून शिंदे गटात सामील झाले. तर राष्ट्रवादीचे दोन आमदार जितेंद्र आव्हाड ( कळवा-मुंब्रा ), दौलत दरोडा (शहापूर ), तसेच मनसे, प्रमोद पाटील ( कल्याण ग्रामीण ), समाजवादीचे रहिश शेख ( भिवंडी पूर्व ), अपक्ष गीता जैन ( मीरा भाईंदर ) असे जिल्ह्यात एकूण १८ आमदार आहेत.
१८ पैकी १५ आमदारांचा भाजपाला पाठींबा : सध्याच्या घडीला भाजपाचे ८ आणि शिंदे गटाचे ५ आणि मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी आजच भाजपात प्रवेश केला. शिवाय मनसेचे राजू पाटील यांनीही राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत भाजपा उमेदवाराला मतदान केले. एकंदरीतच भाजपाच्या गोटात आमदारांची संख्या पाहता १८ पैकी १५ आमदार भाजपाला आपल्या गोटात सामील करण्यात यश आले आहे.
भाजपाला विरोध करणारे केवळ तीन आमदार : जिल्ह्यात तीन वर्षापासून भाजपाला शह देण्यासाठी शिवसेना आक्रमक होती. यापुढे मात्र राष्ट्रवादीचे मंत्री आव्हाड व शहापूरचे आमदार दरोडा हे दोन आणि समाजवादीचे भिवंडीतील आमदार रईस शेख असे तीन आमदार भाजपाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यात दिसून येतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.