मीरा भाईंदर (ठाणे) : भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एक वृध्द व्यक्तीचा मृत्यू झाला होता. रविवार ५ जुन रोजी ही बातमी ईटीव्ही भारतने प्रसिद्ध केली होती. यांनतर आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्या मृत वृद्ध व्यक्तीच्या पत्नीने भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी महिलेकडून सर्व हकीकत ऐकूण घेत, त्यांना मदतीचे आश्वासन दिले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे आज (सोमवार) मीरा भाईंदरच्या पाहणी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाची पाहणी केली. तसेच त्यानंतर पत्रकार परिषद घेत माध्यमांना संबोधीत केले.
हेही वाचा - मुंबईत धारावी, अंधेरीसह कुर्ला येथे सर्वाधिक कोरोनाच्या मृत्यूंची नोंद
भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शनिवार (4 जुन) रोजी एक धक्कादायक प्रकार घडला. रुग्णालयात प्रवेश न मिळाल्याने एका वृद्ध रुग्णाला तब्बल 14 तास भर पावसात रुग्णालयाच्या बाहेर बसून रहावे लागले होते. त्यामुळे, त्या वृद्ध व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आज (सोमवार) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ठाणे दौऱ्यावर असताना मिरा भाईंदर येथील या रुग्णालयात आले होते. त्यानंतर त्या मृत वृद्ध व्यक्तीच्या पत्नीने फडणवीसांची भेट घेतली. तसेच आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे कसा आपल्या पतीचा जीव गेला, हे सविस्तर सांगितले. यानंतर फडणवीस यांनी त्यांना न्याय मिळवून देण्याचे आणि चौकशी करण्यासाठी सुचना करणार असल्याचे आश्वासन त्यांना दिले.
हेही वाचा - रुग्णालयात दाखल करुन न घेतल्याने वृध्द व्यक्तीचा मृत्यू
पाहणी दौऱ्यानंतर दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी महानगरपालिका मुख्य कार्यालयात बैठक घेतली. त्यात त्यांनी आयुक्तांना अनेक सुचना केल्या. तसेच त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदे घेत याबाबत माहिती दिली. बैठकीत प्रमुख मुद्द्यावर चर्चा करत शहरात एकमेव शासकीय रुग्णालय आहे. त्याठिकाणी उपचार व्यवस्थितरित्या रुग्णांना मिळाल्या पाहिजेत. मात्र, नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, याकडे फडणवीसांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
कोविड केयर सेंटरमध्ये जेवण, गोळ्या-औषधे वेळेवर मिळत नाही. गरम पाणी नाही, या सर्व तक्रारी आल्या असल्यामुळे सर्व बाबतीत फडणवीस यांनी प्रशासनाला काही सूचनाही दिल्या. फडणवीस यांनी पालिका मुख्यालयात बैठक घेतली, त्यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, आयुक्त डॉ. विजय राठोड, महापौर जोस्ना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोत तसेच सर्व आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.