ठाणे - गेले काही दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने राज्यात हाहाकार उडवला आहे. पूर आणि दरडी कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच मुंब्र्यात एका इमारतीच्या प्रवेश द्वाराजवळील भाग खचल्याने एकच खळबळ उडाली. मुंब्र्यातील ठाकूरपाडा येथील स्वस्तिक इमारत ही एका मोठ्या नाल्याच्या बाजूला बांधली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या डोक्यावर नेहमीच टांगती तलवार होती. केवळ दहा वर्ष जुन्या असलेल्या या आठ मजली इमारतीत तब्बल 40 फ्लॅट्स आहेत. आज अचानक या इमारतीच्या प्रवेश द्वारासमोरील भाग खचल्याने एकच गोंधळ उडाला.
इमारतीला असलेला धोका पाहता घटनास्थळी पोहोचलेल्या ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. या सर्वांना जवळच्या महापालिका शाळेत ठेवले असून, ही संपूर्ण इमारत सील करण्यात आली आहे.
40 कुटुंबाना शाळेत हलवले -
या इमारतीला धोका निर्माण झाल्याने पालिका प्रशासनाने इमारतीमधील सर्व 40 कुटुंबांना पालिकेच्या शाळेत हलवले आहे. याच इमारतीच्या शेजारी असलेल्या इमारतीवर देखील प्रशासन लक्ष ठेवून आहे. आवश्यक वाटल्यास त्यावर त्वरित उपाययोजना होणार आहेत.
नाल्यामुळे इमारत झाली धोकादायक -
या परिसरातील नाल्याचे नूतनीकरण कोरोना काळामुळे पुढे ढकलले होते. मात्र, आता लगेच यावर काम सुरूं करण्यात येणार आहे, जेणेकरून हा धोका टळू शकतो. हा नाला डोंगरावरून येत असल्याने त्याचा प्रवाह जोरात आहे. त्यामुळे त्याने माती वाहुन जाऊन जास्त धोका निर्माण झाला आहे.