ठाणे - कैद्यांमधील कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विशेष पॅरोल मंजूर करण्यात आला. यामुळे कारागृहात कैद्यांची संख्या कमी झाली. मात्र त्याच वेळी पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. एकीकडे पोलीस बंदोबस्त आणि दुसरीकडे या कैद्यांवर लक्ष ठेवण्याचे काम पोलिसांना करावे लागत आहे. त्यात आणखी भर म्हणजे पॅरोलवरचे कैदी बाहेर पडून पुन्हा सक्रिय झाले आहेत.
कोरोनाचा कारागृहातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कैद्यांची संख्या कमी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे राज्य सरकारने या कैद्यांना तात्पुरत्या पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला. १४ मे रोजी सरकारच्या उच्चाधिकार समितीने टाडा, पॉक्सो, मोक्का, एमपीआयडी वगळता हत्या, हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींनाही सोडण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर अशा काही कैद्यांना सोडण्यात आले. राज्यभरात जवळपास 10 हजार कैदी या आदेशाने पॅरोलवर सुटले. त्यातील जवळपास 900 कैदी ठाणे कारागृहातून बाहेर पडले. बाहेर पडल्यावर काही कैद्यांनी पुन्हा गुन्हे करायला सुरुवात केली आहे.
वर्तकनगरमध्ये चोरी
सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आकाश साहू याचीही ठाणे कारागृहातून सुटका झाली. त्याच्याविरोधात यापूर्वी आठ गुन्हे दाखल आहेत. सुटकेनंतर त्याने पुन्हा एकदा गुन्हेगारीस सुरुवात केली. वर्तकनगर परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी त्याने चोरली. त्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली. याच गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा वागळे इस्टेट भागात एका तरुणाला टोळीतील वादातून नग्न करून उठाबशा काढायला लावल्या होत्या. या प्रकरणातही श्रीनगर पोलिसांनी त्याला अटक केली होती. आता पुन्हा त्याला जामीन मिळाला आहे.
पोलीस पकडायला आल्यावर पडून मृत्यू
मुंब्रा येथे घरफोडीप्रकरणी तळोजा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या मोहसीन चिरा याचीही सुटका झाली होती. त्याच्याविरोधात मारहाण, जबरी चोरी, घरफोडी असे १५ गुन्हे दाखल आहेत. सुटका झाल्यानंतर त्याने अमृतनगर परिसरात चोरी केल्याचे उघड झाले होते. त्याला पुन्हा अटक करण्यासाठी मुंब्रा पोलीस पाठलाग करत होते. मात्र, मोहसीन पळ काढत असताना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता.
पोलिसांची दमछाक
ठाणे, कल्याण आणि तळोजा कारागृहातून १ हजार ७३ आरोपी सुटले आहेत. त्यातील ३१९ आरोपी यापूर्वी ठाणे पोलिसांनी अटक केले आहेत. या सर्व आरोपींचा अहवाल ठाणे पोलिसांकडे आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा आणि हद्दीतील पोलीस कर्मचारी या आरोपींवर लक्ष ठेवून आहेत. कोरोनाचा कालावधी संपल्यानंतर या आरोपींना पुन्हा कारागृहात आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. त्यामुळे पोलिसांसाठी ही डोकेदुखी ठरणार आहे. तसेच राज्य सरकानेही आता कारागृह, न्यायालये, पोलीस ठाणे येथील पायाभूत सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
कारागृहात टेस्टिंग
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कारागृहात वेळोवेळी टेस्ट केल्या जात आहेत. नव्याने येणारे कैदी आणि त्यामुळे कोणताही संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.