ठाणे - संपूर्ण देशात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. ठाणे जिल्ह्यातही दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. कोरोनात नफेखोरांच्या कमाईचे साधन ठरलेली इंजेक्शन मुंबई -घाटकोपर येथील एक वितरक सोडल्यास इतर ठिकाणी कुठेच मिळत नाहीत. त्यामुळे कुणी इंजेक्शन देते का इंजेक्शन असे म्हणण्याची वेळ कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातलगांवर आली आहे.
जिल्हा प्रशासनाने तातडीने रुग्णांना लागणारी इंजेक्शन उपलब्ध करून त्यांचे प्राण वाचवावे अशी रुग्णांच्या नातेवाईकांमधून मागणी करण्यात येत आहे. कल्याण, डोंबिवली, भिवंडी, शहापूर, मुरबाड अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर या शहरातच नव्हे तर जवळपास संपूर्ण जिल्ह्यात टॉसिलिझम्ब एक्टेमेरिया 400 एमजी तसेच रेमेडीसीवीर 100 एमजी इंजेक्शन मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शनच्या शोधात भटकंती करण्याची वेळ आली आहे. कधी सोशल मीडियाचा आधार घेत अथवा नातलग, मित्र, राजकीय पक्षांचे पुढारी यांना साकडे घालत इंजेक्शन मिळावे, याकरिता रुग्णाच्या नातेवाईकांना आर्त हाक द्यावी लागत आहे.
रुग्णाचे आधार कार्ड, कोरोना अहवाल तसेच रुग्णालयातील डॉक्टरांकडून देण्यात येणारी चिठ्ठी या आधारे इंजेक्शन उपलब्ध होत आहे. परंतु इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याची चर्चा रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या नागरिकांना इंजेक्शनच्या काळाबाजारामुळे हजारो रुपयांचा भुर्दंड बसत आहे. जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागातील रुग्णांना हे इंजेक्शन मिळावे याकरिता जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यात औषधांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात यावे, अशीही मागणी होत आहे