ठाणे - डोंबिवलीतील पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पुलावर अंतीम टप्प्यातील गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले. सोमवारी सकाळपासून सुरू झालेले काम अगदी वेगाने सरकताना दिसत होते. अत्यंत कमी वेळात सर्व गर्डर बसविण्यात आले असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात या पुलाचे काम पूर्ण होऊन नागरिकांसाठी अर्थात दळणवळणासाठी खुला होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गर्डर बसविण्यासाठी पाच दिवस रस्ता बंद
कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अथक प्रयत्नामुळे कोपर पुलाचे अंतिम टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, राजेश कदम, सतीश मोडक, सागर जेधे, स्वप्नील वाणी, निखिल साळुंके आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. कोपर पुलावर अंतीम टप्प्यातील गर्डर बसविण्यासाठी पाच दिवस राजाजी पथ रस्ता बंद राहणार आहे. त्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली. हा उड्डाण पूल मे अखेपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
हैदराबादहुन आणले गर्डर
या पुलावर एकूण 21 गर्डर बसविण्यात येणार आहेत. यामधील बहुतांशी तुळ्या बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. अखेरच्या टप्प्यातील 7 गर्डर तुळया सोमवारी संध्याकाळपर्यंत बसविण्यात आले. हे गर्डर हैदराबाद येथून आणण्यात आले आहेत. पावसाळ्यापूर्वी या पुलाचे काम कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला पूर्ण करायचे आहे. त्यामुळे सलग 6 दिवसांचा बंद घेऊन हे काम पूर्ण करण्याचा विडा प्रशासनाने उचलला आहे.
हेही वाचा - 'कोरोना संकटात सगळंच रामभरोसे आहे'