ठाणे - उल्हासनगरात पुन्हा चादर गँगने दहशत निर्माण केली आहे. पहाटेच्या सुमारास चादर गँगने कॅम्प ४ येथील डीजी ओन मोबाईलचे दुकान फोडून तब्बल 10 लाखांचे मोबाईल लंपास केले आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या मदतीने चादर गँगचा शोध घेत आहेत.
विशेष म्हणजे चादर गँग ही रस्त्यावरील कोणाला दिसू नये म्हणून चादरीचा आसरा घेऊन दुकानाचे शटर तोडते , यापूर्वीही भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत चादर गँगने व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरवली होती. मात्र, भिवंडी गुन्हे शाखा आणि कोनगाव पोलिसांनी संयुक्त तपास करत यापूर्वीच्या चादर गँगला वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली होती. अटक केलेल्या त्या गँगने उल्हानसागरच्या शिवाजी चौक येथील साउंड ऑफ म्युझिक या दुकानाचे शटर तोडून 71 लाखांचे मोबाईल लंपास केले होते. आता पुन्हा चादर गँगने उल्हासनगर शहरात धुमाकूळ घातला असून याची दहशत उल्हासनगरात निर्माण झाली आहे. पोलिसांनसमोर चादर गँगचा शोध घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
सोमवारी पहाटेच्या सुमारास चादर गँगने कॅम्प चार येथील डिजी ओन हे इलेक्ट्रॉनिक दुकान फोडून तब्बल 10 लाखांच्या वर मोबाईल लंपास केले आहे. यात चोरट्यांनी सॅमसंग, विवो, ओप्पो, कंपनीचे मोबाईल चोरी केले आहेत. चोरट्यांनी मोबाईलचे रिकामे खोके दुकानात फेकून देत त्यातील फक्त मोबाईल लंपास केले. यामुळे दुकानामध्ये खोक्यांचा ढिगारा जमा झाला आहे.
खळबळजनक बाब म्हणजे या दुकानात चोरीची तिसऱ्यांदा घटना घडली आहे. दुकान मालकाने रात्रीच्या सुमारास घरी जातांना तिजोरीत साहित्य ठेवले असते, तर चोरीची घटना रोखता आली असती. आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.