ठाणे - भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात सुरू असताना ठाण्यातील आनंद नगर डम्पिंग ग्राउंड येथे कचरा वेचक पालकांच्या मुलांसोबत आगळावेगळा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात ( Republic Day In Dumping Ground School ) आला. जिजाऊ शैक्षणिक संस्था व सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. याप्रसंगी मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य व अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. जिजाऊ शैक्षणिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
संस्थेतर्फे विविध उपक्रम
ठाण्यातील आनंदनगर डम्पिंग ग्राऊंडच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या बाजूला जी कुटुंब राहतात. त्या भागात पोहचून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत विद्यार्थांसाठी दरोरज मार्गदर्शन वर्ग चालवले जातात. त्यामुळेच या मार्गदर्शन वर्गला 'कचऱ्यावरची शाळा' असे मानले जाते. या मुलांची परिस्थिती बदलायची असेल तर, या मुलांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे. गरीब परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही. त्यामुळे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेने कचऱ्यावरची शाळा हा उपक्रम सुरु केला. या मुलांना शिक्षण देण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था सर्वतोपरी प्रयत्न करेल. तसेच या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचा तसेच शिक्षणाचा सर्व पुढील खर्च त्या मुलांचे शैक्षणिक स्वप्न पूर्ण होईपर्यंत जिजाऊ संस्थेतर्फे केला जाईल, असे संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी सांगितले.
सामाजिक कार्यासाठी ओळख
याआधी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या माध्यमातून ठाणे शहरातील नागरिकांसाठी मोफत मेहंदी क्लासेस, महिलांसाठी रिक्षा चालविण्याचे ट्रेनिंग, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण इत्यादी मोफत स्वरूपात उपक्रम सुरु आहे. जिजाऊ संस्थेचे उपक्रम पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोकणाच्या पाच जिल्हामध्ये सुरु असून, जिजाऊ संस्था शिक्षण, क्रिडा, आरोग्य, शेती, महिला सक्षमीकरण या पंचसुत्रीसाठी काम करते. यावर्षी संस्थेमार्फत कोकण विभात २५ लाख वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले.