ठाणे - ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील शाहू महाराज विद्यालयाच्या शाळेच्या इयत्ता दहावीच्या मुलांच्या दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत चाकू भोकसल्याने एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना मंगळवारी (दि. 26) घडली. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात भा.दं.वि.चे कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मृत तुषार साबळे (वय 15 वर्षे रा. ज्ञानेश्वर नगर नं. 2, सिध्दार्थ चाळ बुद्धविहारजवळ, वागळे इस्टेट) त्याचे वडील गोरख साबळे हे ठाणे परिवहनच्या टीएमटीमध्ये चालक म्हणून काम करतात. मृत तुषार हा वागळे इस्टेट परिसरातील शाहू महाराज विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होता. सोमवारी (दि. 25) शाळेच्या मैदानावर खेळण्यावरून विविध तुकडीतील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्याचे पडसाद मंगळवारी शाळा सुटल्यानंतर शाळेच्या समोरील आवारातच उमटले. विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत तुषार साबळे याला चाकू भोकसल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी हाणामारी करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. अटकेतील सर्व जण त्याच शाळेत दहावी इयत्तेत शिकत होते. सर्वजण एकाच वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शाब्दिक चकमक ठरली मृत्यूस कारणीभूत
शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीचे पडसाद हे मंगळवारी उमटले. दोन गटामध्ये झालेल्या हाणामारीत तुषार साबळेचा मृत्यू झाला. या प्रकरणी दहावीतील तीन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर हत्येचा खटला बाल न्यायालयात चालविण्यात येणार आहे.
हे ही वाचा - 'लाचलुचपत'च्या जाळ्यात अलगदच अडकला भविष्य निर्वाह निधीचा कर्मचारी