ठाणे - नेहमीच कोणत्याही विषयावर बोलणारे भाजप नेते किरीट सोमैया यांना तोंडावर हात ठेवून चुप्पी साधण्याची वेळ ठाण्यात आली. रामदास कदम यांनी आज मुंबईमध्ये अनिल परब यांच्यावर केलेल्या टीकेविषयी त्यांना विचारण्यात आले होते. यावर बोलणे किरीट यांनी नुसते टाळलेच नाही, तर चक्क तोंडावर हात देखील ठेवला. यावरून आता नवनवीन तर्क वितर्क लावले जाणार आहेत.
हेही वाचा - Omicron MH update : ओमायक्रोनचे 8 नवीन रुग्ण; दुसऱ्या लाटेतील कोरोनाचे आढळले 902 रुग्ण
इतकेच नव्हे तर, कर्नाटकमधील भाजप नेत्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतीत काढलेल्या अनुद्गारवर देखील किरीट सोमय्या यांनी बोलणे टाळले. जेव्हा राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर किरीट सोमैया टीका आरोप करतात त्या विषयावर ते भरपूर बोलतात. मात्र, अशा अडचणीच्या वेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देणे हे त्यांनी वेळ मारून नेण्यासाठी केल्याची चर्चा आहे.
दरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यावर सोमैया यांनी प्रतिक्रिया देत आमचा जो भ्रष्टाचार संकल्प आहे त्यासाठी आशीर्वाद देण्यासाठीच गृह मंत्री अमित शहा महाराष्ट्रामध्ये आले असल्याचे दिसत आहे, असे सांगितले.
कुशासन म्हणजे काय? आणी सुशासन म्हणजे काय? याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे, मोदी सरकारमधील सुशासन आणि कोमामध्ये गेलेली कुशासन सरकार म्हणजेच उद्धव ठाकरे यांची सरकार, अशी टीका करायला सोमैया विसरले नाही.
आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान
छत्रपती शिवराय हे आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान आहे, असे सोमैया म्हणाले. ठाण्यातील कोपरी परिसरातील भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्या सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाजप नेते किरीट सोमैया आले होते. त्यावेळी त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली.