नवी मुंबई - नवी मुंबई शहरातील वाहन पार्किंगसाठी राखीव असलेले भूखंड उद्ध्वस्त करून प्रधानमंत्री आवास योजना उभारण्याचा सिडको घाट घालत आहे. त्याला नाईक यांनी विरोध केला. त्यामुळे सर्वत्र गणेश नाईक भाजपा सोडणार अशा चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर या चर्चामध्ये काहीही तथ्य नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. पार्टी जे काम सांगेल व जिथे पाठवेन, तिथे आपली जाण्याची तयारी आहे, असेही नाईक यांनी म्हटले. शिवाय माझ्यात काहीतरी चांगले गुण असतील, म्हणून बाळासाहेब ठाकरे व शरद पवारांनी मला मोठी जबाबदारी दिली, असेही नाईक यांनी आज म्हटले आहे.
भाजपावर नाराज असल्याने घरचा आहेर दिल्याच्या चर्चा
प्रधानमंत्री आवास योजनेला गणेश नाईक यांनी नवी मुंबई शहरात उभारण्यास विरोध दर्शविला व सिडकोने इतर क्षेत्रात ही योजना राबवावी, असा गणेश नाईक यांनी मुद्दा मांडला होता. त्यामुळे काहींनी गणेश नाईक यांची भाजपावर नाराजी असल्याचे म्हटले होते. मात्र नाईक यांनी असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले. तसेच मी शिवसेनेत होतो तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी ठाणे जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी मला दिली होती. राष्ट्रवादीमध्ये होतो तेव्हा शरद पवारांनी मला पूर्ण अधिकार दिले होते. सध्या मी भाजपात आहे. मात्र जोपर्यंत महापालिका निवडणुका होत नाहीत तोपर्यंत मला कुठेही जाण्याची इच्छा नाही, त्यानंतर जिथे आमचा पक्ष सांगेल तिथे काम करायची माझी तयारी असेल, असे ते म्हणाले.