ठाणे - भंडारा येथील घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. राज्य सरकारच्या सर्व हॉस्पिटल्समध्ये दिरंगाई होते. बेपर्वाई होते. हॉस्पिटलचे ऑडिट, इन्फ्रास्ट्रक्चर यासर्व गोष्टींमध्ये दिरंगाई होते. या दुर्दैवी घटनेची सात दिवसात चौकशी झाली पाहिजे आणि सात दिवसात जे कोणी दोषी आहेत, त्यांना कडक शासन होवून परिवाराला जास्तीत जास्त मदत झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे, असे मत भंडारा दुर्घटनेवर आशिष शेलार यांनी व्यक्त केले. ते ठाण्यात बोलत होते.
'हे हिंदुत्व?'
ते पुढे म्हणाले, आम्ही औरंगाबादच म्हणू, अशा लोकांबरोबर सत्तेला, मांडीला मांडी लावून बसायचे. हे मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वात बसते का? असा सवाल त्यांनी केला.
'सकाळ, दुपार, संध्याकाळ बिघाडी'
महाविकासआघाडी पहिल्यापासून बिघाडी आहे. त्यांनी राज्याला बिघडू नये. युतीत लढल्यामुळे पालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा नेहमी महापौर झाला. यापुढे शिवसेना आणि भाजपा वेगळी निवडणूक लढणार असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी भाजपाचाच महापौर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर भाजपाचे वसंत गिते आणि सुनिल बागूल यांच्या शिवसेना प्रवेशावरही आशिष शेलार यांनी टीका केली.
'तिघेही दुर्बल'
आम्ही स्वबळावर लढणारे आहोत. ते तिघेही दुर्बल आहेत, म्हणून एकत्र येऊन फोडाफोडीचे राजकारण करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.