ठाणे - रिक्षात प्रवाशांच्या ऐवजी भलामोठा अजगर येऊन बसल्याची घटना घडली ( python found in rickshaw in thane ) आहे. ही घटना टिटवाळा शहरात घडली असून अजगराला पाहताच रिक्षा चालकासह प्रवाशांची पळापळ झाल्याची घटना समोर आली आहे.
रिक्षाचालकाने घेतला सुटकेचा निश्वास - पावसाळ्यात विषारी - बिन विषारी साप मोठ्या प्रमाणात मानवीवस्तीत भक्ष्याच्या शोधात येत असल्याच्या घटना घडत आहे. अश्याच एका घटनेत टिटवाळा परिसरात उभ्या असलेल्या रिक्षामध्ये तब्बल ५ फुटी अजगर शिरल्याने भयभीत झालेल्या रिक्षा चालकाने वाॅर फाऊंडेशनच्या सर्पमित्राला संपर्क केला. त्यानंतर माहिती मिळताच सर्पमित्र सागर म्हात्रे ह्यांनी घटनास्थळी दाखल होऊन त्या अजगराला रिक्षातून पकडून एका ड्रममध्ये बंद केले. अजगर पडकल्याचे पाहून रिक्षाचालकासह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला.
सर्पमित्राने केले आव्हान - अजगराच्या कातडीला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी आहे, तसेच मानव हा अजगराचे नैसर्गिक भक्ष्य नसल्याने मानवाला अजगरापासून काही धोका नाही. मात्र काही मानवाकडून भीतीपोटीही अजगराला जीवे मारले जाते. विशेष म्हणजे अजगराच्या कातड्यापासून पर्स, पट्टे वगैरे तयार केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात अजगराच्या कातड्याला मोठी मागणी असते. म्हणूनच अजगराची चोरटी शिकार आणि त्याच्या कातड्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असते. फार मोठ्या प्रमाणावर शिकार झाल्यामुळे अनेक भागांतील अजगर कमी झाले आहेत. भारत सरकारने अजगर पाळणे, मारणे अथवा त्याचे कातडे जवळ बाळगणे यावर कायद्याने बंदी घातली आहे. ही सर्व माहिती सर्पमित्र सागर म्हात्रे ह्यांनी नागरिकांना देऊन जनजागृती केली. कोणाला आपल्या राहत्या परिसरात सर्प किंवा इतर काही वन्यजीव आढळल्यास त्यांनी मारू नये व जवळील प्राणीमित्र किंवा वनविभागाला संपर्क करावा हे आव्हान केले.
अजगराला सोडले निसर्गाच्या सानिध्यात - अजगराला केले निसर्गच्या सानिध्यात सोडून मुक्त - या अजगराला सुखरूप वनविभागाच्या ताब्यात दिले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. चन्ने व वनपाल रामदास घोरले ह्यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गच्या सानिध्यात सोडून अजगराला मुक्त केल्याची माहिती देण्यात आली. अजगराला निसर्ग मुक्त करताना वाॅर फाऊंडेशन अध्यक्ष योगेश कांबळे, प्राणी मित्र प्रेम आहेर, रेहान मोतीवाला, रोमा त्रिपाठी वनविभागाचे कर्मचारी जयेश घुगे व वनरक्षक दळवी उपस्थित होते.