ठाणे - मुस्लिम धर्मियांचा पवित्र असा ईंद उल अदा अर्थातच बकरी ईद ( Bakrid Mubarak ) सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरे होत असताना भिवंडी शहरात ( Bhiwandi city ) एका पिसाळलेल्या रेड्याने ( buffalo ) मालकाच्या तावडीतून सुटका करून घेत पळ काढला आहे. थेट शासकीय कार्यालयाच्या ( Government Office ) आवारात येत तेथे मोठा धुमाकूळ घातला आहे. तब्बल 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर या पिसाळलेल्या रेड्याला काबूत करण्यात नागरिकांना यश आले आहे.
मालकाच्या हातातील दावण तोडून रेड्याने काढला पळ - भिवंडीत बकरी ईंद निमित्ताने मोठ्या प्रमाणावर बकरे तसेच रेडे कुर्बानीसाठी विकत घेण्यात आले. यामध्ये शहरातील गैबी नगर परिसरातील एका व्यक्तीने एक भला मोठा अजस्त्र वजनाचा रेडा कुर्बानीसाठी आणून आपल्या घराच्या आवारात बांधून ठेवला होता. काल सकाळी या रेड्यास कुर्बानीसाठी घेऊन जात असताना रेडा अचानक पिसाळला आणि त्याने मालकाच्या हातातील दावण तोडून पळ काढला. सैरावैरा पळस सुटलेल्या या रेड्याने भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यालय शेजारील पंचायत समिती व तहसीलदार कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. या ठिकाणी त्याला पकडण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक तसेच पोलीस दाखल झाले होते.
रेड्याला पकडणाऱ्यांची दमझाक - भिवंडी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात या रेड्याने तब्बल 2 तास धुमाकूळ घालून या पकडणाऱ्यांची दमझाक केली. अखेर तहसीलदार कार्यालय जवळील सब जेल शेजारील निमुळत्या जागेत तो रेडा आल्याने त्याला पकडण्यात आले. त्यानंतर त्यास बांधून ठेवल्याने सर्वांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे. परंतु, तो पर्यंत अनेकांची करमणूक ही झाली आहे.