ठाणे - महिलेच्या घरात घुसून तिच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. ही घटना १२ जानेवारीला सकाळी भिवंडी तालुक्यात काल्हेर गावातील जय दुर्गा सोसायटीमध्ये घडली होती. सुरेद्र प्रतापसिंह भाटी (वय २४, रा.धार, मध्यप्रदेश) आणि मानसिंग उर्फ बंटी सदन चौहाण (वय २०) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
महिलेवर गोळीबार केल्याच्या घटनेत भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाकडे कुठलाही सुगावा नव्हता. मात्र, पोलिसांनी अथक प्रयत्न करून तीन दिवसात आरोपीला जेरबंद केले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ब्लॅकमेलिंगच्या प्रकारातून ५० हजार रुपये मागणीच्या वादातून आरोपीने घरात घुसून गोळीबार केल्याचे पोलीस तपासात समोर आले. या दोघांनाही मध्यप्रदेशमधील धार शहरातून ताब्यात घेऊ अटक केली आहे. जयश्री देडे ( वय ३६ ) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर अद्यापही अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
ब्लॅकमेलच्या प्रकारातून घडला गुन्हा-
जखमी जयश्री या काल्हेर मधील जय दुर्गा सोसायटीमध्ये आपल्या परिवारासह राहत आहेत. त्या पतीसह ट्रान्सपोर्ट व्यवसाय सांभाळतात. आरोपी सुरेंद्र भाटी हाही भिवंडीत ट्रान्सपोर्टमध्ये काम करीत असताना त्याची जयश्री यांचे पती शिवराम देडे यांच्यासोबत ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेऊन जयश्री यांची खोटी बदनामी करण्याच्या नावाने धमकी देत, ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, ही महिला त्याला ५० हजार देण्यास नकार देत होती. मात्र , त्याला पैशाची गरज असल्याने त्याने साथीदार मानसिंग उर्फ बंटी चौहाण याच्यांशी संगनमत करून गोळीबार केल्याचे समोर आले आहे.
असा रचला होता गोळीबाराचा कट -
आरोपी भाटी आणि बंटी १२ जानेवारी सकाळी महिलेच्या घरात घुसून देशी बनावटीच्या पिस्तुलचा धाक दाखवून पैशाची मागणी करीत होते. मात्र, महिले नकार देऊन आरडाओरडा केल्याने आरोपी सुरेद्र भाटी याने महिलेच्या डोक्यामध्ये गोळी झाडली. या गोळीबारत महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यावेळी महिलेचा मुलगा व शेजारी राहणार चेतन पवार मदतीसाठी आले असता आरोपीने त्यांच्या दिशेनेही गोळीबार करून फरार झाले होते. आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. मुख्य आरोपी भाटी याच्यावर मध्यप्रदेश येथे राजगड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे,) किसन गवळी यांनी सांगितले.