ठाणे - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमावर्ती भागामधील रामनगर परिसरात एका नाल्यामध्ये मगरीचे पिल्लू आढळून आले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हे पिल्लू ताब्यात घेतले. त्यानंतर या पिल्लाची तपासणी करुन पुन्हा जंगलात सोडण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
रामनगर भागातील नाल्यामध्ये मगरीचे पिल्लू असल्याची माहिती नागरिकांनी येऊर वनविभागाकडे दिली. यानंतर वनरक्षकांनी ते पिल्लू ताब्यात घेतले. दरम्यान, हे पिल्लू ठाणे वनविभागाकडे देण्यात आले असून त्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. हे पिल्लू साधारण तीन ते चार आठवड्याचे असून ते १५ सेमी लांबीचे असल्याचे पशुवैद्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या पिल्लाची प्रकृती चांगली असून ते जंगलामध्ये सोडण्यास योग्य आहे. यामुळे वनविभागाकडून त्याची तपासणी करून त्याला पुन्हा जंगलामध्ये सोडण्यात येणार आहे. परंतु, या भागात आणखी काही पिल्ले वाहून आल्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभाग आणि 'वाइल्ड लाइफ वेल्फेअर'कडून या भागात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. हा नागरी वस्तीचा भाग असल्याने अन्य पिले असल्यास त्यांना दुखापत होऊ नये, यासाठी हे शोध कार्य चालवण्यात येणार आहे, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.