ठाणे - दुचाकी वाहनाचे जळीतकांड प्रकरण घडल्यानंतर मागच्या काही महिन्यापासून पुन्हा एकट्यादुकट्या दुचाकी अचानक पेटण्याची घटना ठाण्यात विविध भागात घडल्या. गुरुवारी ठाण्याच्या वागले इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव येथे दोन चारचाकी वाहने अचानक पेटल्याची घटना घडली. आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान तोपर्यंत या आगीत ही वाहने स्वाहा झाली.
ठाण्याच्या वागले इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव एमआयडीसी कॉलोनी परिसरातील मोकळ्या जागेत एक ऑटोरिक्षा आणि एक वेंगेनर कार पार्किंग केलेली होती. दोन्ही चारचाकी वाहनाना गुरुवारी अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पालिकेचे आपत्ती व्यवस्थापनाची टीम आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी एक फायर इंजिन, वॉटर टँकर आणि एक रेस्क्यू व्हॅनसह घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले. दोन्ही वाहने ही आगीत भस्मसात झाली. सदर घटनास्थळ हे रायलादेवी तलाव परिसराच्या बाजूलाच असलेल्या मोकळ्या जागेत असल्याने कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती पालिका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले .
ठाण्यात या आधी अनेकदा झाले आहेत प्रकार -
पुर्व वैमनसयातून या आधी ठाण्यात आगी लागण्याचे अनेक प्रकार झाले आहेत यासंदर्भात अनेक गुन्हे दाखल असुन हे प्रकार थांबलेले नाहीत. मागील 15 दिवसापुर्वी श्रीनगर भागात दोन दुचाकी पेटवण्यात आल्या होत्या. या घटनेतील आरोपी पकडणे अजूनही बाकी आहे.