ठाणे - कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्यांसाठी रेल्वेचा प्रवास बंद करण्यात आला होता. त्याचवेळी स्वयंचलित तिकीट यंत्रणा(Automatic Ticket Machine) देखील बंद करण्यात आली होती. ती अद्यापही बंदच आहे. त्यामुळे नागरिकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासात मुभा देण्यात आली आहे. प्रत्येक प्रवाशाचे लस प्रमाणपत्र पडताळणी करून तिकीट देण्याच्या प्रक्रियेत जास्त वेळ जात असल्यामुळे तिकीट खिडक्यांसमोर लांबलचक रांगा लागत आहेत.
तिकिटासाठी प्रवाशी तासंतास रांगेत -
ठाणे रेल्वे स्थानकात(Thane Railway Station) प्रवाशांना स्वयंचलित तिकिटाची सुविधा पुरवणाऱ्या यंत्रणा अद्याप सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नाईलाजाने प्रवाशांना तिकिटासाठीच्या रांगेत वेळ खर्ची घालवावा लागत आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून लशींची दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे वेळ वाया जात असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्रवासापेक्षा तिकिटासाठी वेळ जास्त -
ठाणे स्थानकात तिकीटासाठी असलेली गर्दी ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रवासासाठी लागणारा वेळ हा कमी असून तिकीटासाठी लागणारा वेळ हा जास्त आहे. त्यामुळे अनेक प्रवासी हवालदिल झालेले आहेत. तासंतास रांगेमध्ये उभे राहून देखील वेळेवर तिकीट न मिळाल्याने रेल्वे प्रशासनाच्या विरोधामध्ये प्रवाशांमध्ये नाराजी आहे.