ठाणे - सोशल क्लबच्या पडद्याआड कल्याण-डोंबिवलीत मटक्याचे गोरखधंदेही चालतात. मटका किंग मुनिया अर्थात जिग्नेश ठक्कर याचा प्रतिस्पर्धी टोळक्याने गेल्यावर्षी खून केल्यानंतर उघड झाले. जवळपास डझनभर गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी असलेल्या याच मुनियाचे सोशल क्लबच्या नावाखाली मटक्याचे धंदे बिनबोभाट सुरू होते. त्यानंतर त्याचा हा मटक्याचा वारसदार कोण चालवणार अशा प्रश्नाची त्यावेळी चर्चा व्हायची? यावरून लोकल अंडरवर्ल्डमध्ये कुजबुज सुरू आतानाच, मुनियाचा काटा काढणारा धर्मेश उर्फ नन्नू शाह याने, त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चांगलीच हवा केली आहे. त्यामुळे जेलमधून लोकल अंडरवर्ल्डची सूत्रे हलविणाऱ्या गँगस्टर नन्नू शाह याच्या हालचालींवर पोलिसांनी करडी नजर रोखली आहे.
त्यामुळे मटका किंग मुनियाची हत्या केल्याचा गौप्यस्फोट
मुनियाला अगदी जवळून गोळ्या झाडणारा जयपाल उर्फ जापान डुलगज पोलिसांच्या हाती लागल्यानंतर या हत्येचे गुपित उघड झाले. जयपाल उर्फ जापान हा मुनियाचा प्रतिस्पर्धी धर्मेश उर्फ नन्नु नितिन शहा याचा ड्रायव्हर कम बाऊन्सर आहे. त्याच्या तोंडून अनेक गुपिते बाहेर पडली. बाबू जेठवा उर्फ बाबू भंगी याला जिग्नेश याने गँगस्टर धर्मेश उर्फ नन्नू शाह याला ठार मारण्याची सुपारी दिली होती. त्यामुळे आम्ही मटका किंग मुनियाची हत्या केल्याचा गौप्यस्फोट अटकेत असताना, जयपाल उर्फ जपान याने पोलिसांजवळ केला होता.
गुन्हेगारी क्षेत्रातील वर्चस्व व आर्थिक वादातून हत्या
मटका किंग मुनियाच्या हत्येतील मुख्य मारेकरी धर्मेश उर्फ नन्नू शहा हा एकेकाळी छोटा राजन गँगमधील टॉपचा शार्प शुटर मानला जायचा. धर्मेश उर्फ नन्नू हा 1980 च्या दशकापासूनच गुन्हेगारी क्षेत्रात तग धरून आहे. त्याच्या नावावर खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, आदी 15 गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे गेल्या 16 वर्षांपूर्वी मटका किंग मुनिया हा धर्मेश उर्फ नन्नू याच्या छत्रछायेत राहून गुन्हेगारी जगतात उदयास आला होता. मात्र, धर्मेश उर्फ नन्नू याच्याशी वेगळे होऊन मुनिया कल्याण रेल्वे स्थानक परिसरात बस्तान बसवून स्वतःच गुन्हेगारी क्षेत्रात हात-पाय पसरायला लागला होता. त्यातच तो मटका किंग मुनीया या नावाने गुन्हेगारी क्षेत्रात ओळखू लागला. हे समजल्यानंतर धर्मेश उर्फ नन्नू याच्या पायाखालची जमीन सरकली. गुन्हेगारी क्षेत्रातील वर्चस्व व आर्थिक वादातून मटका किंग मुनियाची गेल्या वर्षी 31 जुलैच्या रात्री चौघांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मुनियाचे पर्व संपुष्टात आले.
पोलीस चकमकीच्या भीतीने तो गुजरातला पळाला
गुन्हेगारी क्षेत्रात वर्चस्व तसेच आर्थिक वादातून आपल्या बालपणीचा मित्र मुनिया उर्फ जिग्नेश याला ढगात पाठवणाऱ्या धर्मेश उर्फ नन्नू नितिन शहा आणि त्याचा ड्रायव्हर कम बाऊन्सर जयपाल उर्फ जापान या दोघांनी अन्य 2 साथीदारांसह तेथून पळ काढला. मटका किंग जिग्नेशची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर मुख्य शूटर नन्नू शहा हा भूमिगत झाला होता. पोलीस चकमकीच्या भीतीने तो गुजरातला पळाला. पोलिसांनी त्याच्या 29 ऑगस्ट रोजी गुजरातमधून मुसक्या आवळल्या. सद्या हा गँगस्टर तुरूंगात अंडरट्रायल आहे. मात्र मटका किंग मुनियाच्या मृत्यूनंतर त्याच्या गोरख धंद्यांचा वारसदार कोण, यावरून लोकल अंडरवर्ल्डमध्ये चर्चा सुरू असतानाच, मुनियाचा काटा काढणाऱ्या धर्मेश उर्फ नन्नू नितिन शहा या पोलीस रेकॉर्डवरील कुख्यात गँगस्टरचा चेहरा वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या हस्तकांनी कल्याण शहरभर लावलेल्या बॅनर्सवरून समोर आला आहे. हा गँगस्टर जेलमध्ये बसून त्याच्या गुन्हेगारीचे सूत्रे हलवत असावा, असा पोलिसांचा कयास आहे. त्यामुळे पोलिसांनी नन्नू शहा आणि त्याला सरकार नावाची स्वयंघोषित पदवी देणाऱ्या त्याच्या हस्तकांच्या हालचालींवर करडी नजर ठेवली आहे.
गँगस्टर नन्नू शाहच्या बॅनर्समुळे पोलीस सतर्क
या संदर्भात माहिती देताना महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव म्हणाले, धर्मेश उर्फ नन्नू शाह याच्या वाढदिवसानिमित्त कल्याण शहरात वेगवेगळ्या ग्रुपने बॅनर्स लावले होते. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून कोणतीही अधिकृत परवानगी बॅनर्स लावण्यासाठी घेण्यात आली नाही. केडीएमसीकडून दिलेल्या तक्रारीनुसार आतापर्यंत पोलीस ठाण्यांतून 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात 2, बाजारपेठ पोलीस ठाण्यात 1 आणि खडकपाडा पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.