ठाणे - ठाणे वाहतूक विभागाच्यावतीने २८ मार्च आणि २९ मार्च रोजी ठाणे आयुक्तालय परिसरातील तब्बल १८ वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत १,३६३ जणांवर विविध नियम मोडल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली.
वाहनांत बदल
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या पाच परिमंडळातील १८ वाहतूक विभागाच्या अंतर्गत २८ मार्च आणि २९ मार्च या दोन दिवशी केलेल्या कारवाईत १, ३६३ जणांवर कारवाई करण्यात आली. यात २८ मार्च रोजी ड्रिंक अॅण्ड ड्राइव्हमध्ये २ जणांवर, दुचाकीवर क्षमतेपेक्षा अधिक जणांनी प्रवास करणे (ट्रिपल सीट) प्रकरणी २८ जणांवर तर हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या २७७ जणांवर तसेच मूळ वाहनात बदल करून सायलेन्सरमध्ये हेराफेरी करणाऱ्या दोघांवर अशा ३०९ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
दोन दिवस मोठी कारवाई
वाहतूक पोलिसांच्या २९ मार्चच्या कारवाईत ड्रिंक अँड ड्राइव्ह (कलम १८५) नुसार ४६ जणांवर तर कलम १८८नुसार ३१ जणांवर कारवाई करण्यात आली. तर ट्रिपल सीट प्रकरणी ७० जणांवर, हेल्मेट विना दुचाकी चालविणाऱ्या ९०५ जणांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. तर मूळ दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये हेराफेरी करणाऱ्या दोन जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान वाहतूक विभागाच्या दोन दिवसाच्या धडक कारवाईत वाहतूक पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणी ७९, ट्रिपल सीट प्रकरणी ९८ आणि हेल्मेटविना दुचाकी चालविणाऱ्या १,१८२ दुचाकी स्वारांवर कारवाई केली तर सायलेन्सरमध्ये मॉडिफाइड(बदल) केल्याप्रकरणी ४ जणांवर कारवाई केळ्याची माहिती वाहतूक पोलीस उपयुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.