ठाणे - राज्यात सराफा दुकान फोडून घरफोडी चोरी करणे, दरोडें, दरोडयाची तयारी, खुनाचा प्रयत्न व सोनसाखळी चोरी अशा अकरा गुन्हे करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला महात्मा फुले पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सापळा रचून अटक केली आहे. शिवासिंग विरसिंग दुधानी असे आरोपीचे नाव आहे.
पॅरोल रजेवर असतानाही केले गुन्हे
१८ जून रोजी सकाळी तक्रारदार पूनम अशोक सिंग, (वय ५७ वर्षे) या कल्याण पश्चिम भागातील ठाणगेवाडीकडून रामबागकडे जाणाऱ्या रोडवरून मॉर्निंग वॉक करीत होत्या. त्याच सुमारास बाईकवर दोघांपैकी एकाने गण्यातील मंगळसूत्र हिसकावले. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात भादवि कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबद्दल अधिक तपास केला असता गुन्हेगार हा पॅरोल रजेवर असल्याचे समजले. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी अटक केली.
सराईत गुन्हेगाराने साथीदारसह केले २३ गुन्हे
आरोपीच्या नावाने रसायनी, यवतमाळमधील वडकी, वर्धा येथील वडनेर, नागपूरमधील मौदा, भंडारा येथील जवाहरनगर, साकोली यासह लावणी येथे घरफो़ड्याचा गुन्हे दाखल झाले आहेत. वरीलपैकी ११ गुन्हयात अटक करायचे असल्याची माहिती सहा. पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली आहे. याने साथीदारासह दरोडा टाकणे, दरोड्याची तयारी, खुनाचा प्रयत्न केला आहे. तर सोनसाखळी, मोटारसायकल चोरी असे २३ गुन्हे आहेत.
१ लाख ३४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
आरोपीने महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन येथील ४ गुन्ह्याची कबुली दिली आहे. या गुन्हयातील मंगळसूत्र, रोख रक्कम, रोडा कंपनीची सीबी शाईन मोटार सायकल असा एकूण १, लाख ३४, हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केला आहे.
हेही वाचा - बँकांच्या एनपीए वसुली करता दोन कंपन्यांची स्थापना; 30,600 कोटीची केंद्र देणार हमी