ठाणे - उत्तर प्रदेशमधील आजमगढमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अंबरनाथ शहरातून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०१९साली आरोपीने पीडित मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्यानंतर तो दोन वर्षांपासून फरार होता. सिद्धेश महेश बने (वय २८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करीत पोलिसांना गुंगारा
उत्तर प्रदेशमधील आजमगढ जिल्ह्यातील तहबरपूर पोलीस ठाण्यात २०१९ साली आरोपीवर भादंवि कलम ३६३, ३६६, ५०६, ३७६(ड)सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासूनच त्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी फरार म्हणून घोषित केले होते. त्यातच आरोपी सिद्धेश हा अंबरनाथ पूर्व, शिवाजीनगर गणपती मंदिर रोड भागात राहणार आहे. त्यामुळे त्याचा शोध घेणेकामी वेळोवेळी तहबरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येवून गेले होते. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करीत असल्याने पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
आरोपीस दिले उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात
आरोपी सिद्धेशच्या ठावठिकाण्याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जमदाडे, एस. व्ही पाटील, सहा. पो. उपनिरीक्षक अर्जुन जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार अंबरनाथ पूर्वेत एका ठिकाणी सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक जमदाडे यांच्यासह पथकाने आरोपी सिद्धेश बने याला १३ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले. तर आज उत्तर प्रदेशमधील तहबरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बसंत लालसह त्यांच्या पथकाच्या ताब्यात दिल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोगे यांनी दिली आहे.