नवी मुंबई - कोपरखैरणे येथील सारस्वत बँकेत चोरी करणारे चोरटे अखेर गजाआड करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. मुंबई परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी दुपारी कोपर खैरणे सेक्टर-19 येथील सारस्वत बँकेवर दरोडा पडल्याची घटना घडली होती. कर्ज मागण्याचा बहाणा करून आरोपी बँकेत येत होते. यातील एका आरोपीचे कोपरखैरणे परिसरात चपलांचे दुकान असून, लॉकडाऊनमुळे सद्यस्थितीत ते बंद आहे.
स्वनिल सपकाळ (30) भूषण चौधरी (35) हे दोघेही चेंबूर येथे राहणारे आहेत. या दोघांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना चाकू व पिस्तुलाचा धाक दाखवून लॉकररूम उघडण्यास भाग पाडले आणि लॉकरमधील साडेचार लाखाची रोकड लुटून पळ काढला होता. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासकार्य केले होते. तपासादरम्यान सीसीटीव्हीचील दृश्यांमधून संशयित चोरट्यांची माहिती समोर आली होती. त्यानुसार चोरट्यांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत जगदाळे यांनी तपास पथके तयार केली.
हेही वाचा - टाळेबंदी विरोधात वकीलाची न्यायालयात धाव, सोमवारी जनहित याचिकेवर सुनावणी
सहायक निरीक्षक शेख यांच्या पथकाला मुंबईत लपलेल्या संशयितांची माहिती मिळाली. सापळा रचून शुक्रवारी रात्री उशिरा पथकाने त्याठिकाणी छापा टाकला असता, दोघांना ताब्यात घेतले आहे. या चोरट्यांचे इतर तीन साथीदार अजूनही फरार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरात लॉकडाऊन सुरू आहे. जागोजागी पोलिसांचा कडक बंदोबस्त असूनही भरदिवसा बँक लुटल्याच्या घटनेमुळे नवी मुंबईत परिसरात खळबळ उडाली होती.
सदर टोळीने बँक परिसराची टेहळणी करून दरोडा घातला होता. बँकेत दोघेजण दरोडा टाकत असताना बाकीचे साथीदार बाहेर पहारा देत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. गुन्हा घडल्यानंतर बँकेतील सीसीटीव्ही आणि परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून गुन्ह्याचा उलगडा झाल्याचे माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पुढे तपास सुरु असल्याचे पोलिसांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.