ठाणे - ठाण्यातील तीन हात नाका परिसरातल्या ह्युंदाई शोरूम समोर एका दुचाकीने अचानक पेट घेतला. इंजिनला लागलेल्या आगीने क्षणातच पेट्रोलच्या टाकीला विळखा घातला. त्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, दुचाकी संपूर्ण जळून खाक झाली.
दिवसेंदिवस वाहनांनी पेट घेण्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बुधवारी दुपारीही दुचाकी पेटल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी या रस्त्यावरची वाहतूक बंद करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली होती. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.