ठाणे - एका ७० वर्षीय वृद्धाची तारेने गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना समाोर आली आहे. अंबरनाथ तालुक्यातील वसार गावाकडे जाणाऱ्या एका वीटभट्टीजवळ वृद्धाचा मृतदेह आढळून आला असून मागील दोन दिवसापासून ही व्यक्ती बेपत्ता होती. हिल लाईन पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
शेजुमल रामनानी (७०) असे हत्या करण्यात आलेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. उल्हासनगरमधील कॅम्प नंबर ५ येथील लालचक्की भागात ही व्यक्ती राहत असे.
हेही वाचा... ऐकावे ते नवलच... ‘मॅगी‘वरून पती-पत्नीत हाणामारी, पत्नीचा हात फ्रॅक्चर
मृत शेजुमल रामनानी हे मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होते. मात्र, काल दुपारच्या सुमारास वसार गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याजवळ एका वीटभट्टी शेजारी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. तारेने गळा आवळून त्यांची ह्त्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे. या घटनेची माहिती हिल लाईन पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतील. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला.
आर्थिक बाबीतून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृत रामनानी यांच्या मुलाच्या तक्रारीवरून अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज शोधणे आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू केली असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असे उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांनी सांगितले आहे. या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत करत आहे.
हेही वाचा... गोंदियात ठाणेदारासह पीएसआयला लाच घेताना अटक; 'एसीबी'ची कारवाई