ठाणे - कळव्यात एका 40 वर्षीय व्यक्तीने उड्डाण पुलावर स्वत:ला गळफास लावून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, शहर वाहतूक पोलीस आणि स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे क्रेनच्या साहाय्याने या व्यक्तीला वाचवण्यात यश आले. भगवान कांबळे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या मुलाचे नुकतेच निधन झाल्याने मानिसक धक्क्यातून त्यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.
आज (दि.3डिसेंबर)ला सकाळी कळवा नाका उड्डाण पुलावर दोरखंड बांधून भगवान कांबळे यांनी गळफास घेतला. मात्र, पुलाखाली उभ्या असलेल्या लोकांनी पोलिसांना पाचारण करुन क्रेनच्या साहाय्याने भगवान कांबळेला सुखरुप खाली उतरवले. यानंतर त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित व्यक्तीने हे कृत्य करताना मद्यप्राशन केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे.