ठाणे - उल्हासनगर कॅम्प ४ येथील रघुनाथ नगर परिसरात एका लग्न समारंभात नवरदेव व्यस्त असतांना त्याच्या घरातील कपाट फोडून त्यामधील दागिने व रोकड असा ३ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी चार चोरट्यांना २४ तासातच ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लंपास केलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगस्त करत चोरांना अटक केली आहे.
चारही आरोपी अट्टल गुन्हेगार
विशेष म्हणजे या चौघांत एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. सुनील पारधे (वय ३२), अशोक शिवराम दिघव (वय २६), विकी वाल्मिक पगारे (वय २३) असे गजाआड केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तर एक १७ वर्षीय अल्पवयीन चोरट्याचा समावेश आहे. हे चारही आरोपी अट्टल गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
कुटूंब हॉटेलमध्ये गेले होते लग्नाला
उल्हासनगर कॅम्प ४ येथील रघुनाथ नगर या परिसरात विकास दुबे हे राहतात. २८ एप्रिल रोजी विकासचे, प्रवीण इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये लग्न होते. लग्न असल्याने तो व त्याचे कुटुंबीय सकाळी हॉटेलमध्ये पोहचले. यावेळी घराला कुलूप लावले होते. त्यांनतर २९ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास विकास व त्याचे कुटुंबीय नवरीला घेऊन घरी परतले. त्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक उघडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस दरवाजा आतून लावलेला असल्याचा त्यांना अंदाज आला.
खिडकीचा ग्रील वाकवून चोरट्याचा घरात प्रवेश
नवरदेव विकास व त्यांचा मामा घराच्या मागील बाजूस गेले तेव्हा किचनच्या खिडकीचा ग्रील वाकवून अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला असल्याचे त्यांना दिसून आले. तसेच मुख्य दरवाजा आतून लॉक केलेला आढळला. घराच्या बेडरूममध्ये असलेला लोखंडी कपाट उघडून त्यातील २ लाख ५० हजार रोख रक्कम, सोन्याचे दागिने, लॅपटॉप असा ३ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्याने लंपास केला होता. त्यांनतर गुप्त माहितीच्या आधारे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत यांनी पोलीस पथकासह उल्हासनगरमध्येच सापळा रचून अवघ्या चोवीस तासांच्या आत चारही चोरट्यांना अटक केली. तर एका अल्पवयीन आरोपीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची रवानगी भिवंडीच्या बालसुधारगृहात केली आहे .
तीन चोरट्यांना ५ मे पर्यंत पोलीस कोठडी
पोलिसांनी आरोपींकडून २ लाख ५० हजार रोख रक्कम, सोन्याचे दागिने, लॅपटॉप असा ३ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. आज ३ आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना न्यायालयाने ५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा - 'कोरोना संकटात सगळंच रामभरोसे आहे'