ठाणे - नुकत्याच अटक केलेल्या संशियत दहशतवाद्यांच्या तपासात रेल्वेसह लोकलला लक्ष केल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे स्थानकात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यातच शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आलेल्या कोणार्क एक्सप्रेसच्या डी 2 बोगीतील एका सीट खाली सापडलेल्या बेवारस बॅगेतून 21 किलो अमली पदार्थ कल्याण आरपीएफने जप्त केले आहे. हे अमली पदार्थ (गांजा) नारकोटिक्स विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
हे ही वाचा - राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; पॉर्नोग्राफीनंतर मनी लाँड्रिंग प्रकरणी केस दाखल
प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला बेवारस बॅगविषयी माहिती..
शुक्रवारी पहाटे 2 वाजून 30 मिनिटाच्या वाजण्याच्या सुमारास उडीशाहून कल्याण स्थानकात येत असलेल्या कोणार्क एक्सप्रेसच्या डी 2 बोगीतील एका सीटखाली बेवारस बॅग असल्याची माहिती प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला प्राप्त झाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी कल्याण आरपीएफ जवानांना सूचना देण्यात आल्या. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कल्याण आरपीएफचे स्टेशन प्रभारी भुपेंद्र सिंह आणि त्यांच्या पथकाने कोणार्क एक्सप्रेस रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकातील 7 नंबर फलाटावर दाखल झाली. आरपीएफ जवानांनी सुरक्षेच्या कारणास्तव एक्स्प्रेसची संपूर्ण बोगी रिकामी करत तपासणी केली असता सीट खाली लाल रंगाची ट्रॉली बॅग आणि काळ्या रंगाची सॅक बॅग आढळून आली.
हे ही वाचा - उद्या अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलीस सज्ज, पुण्यात अशी आहे तयारी
अमली पदार्थ कोणी आणि कुठून आणले तपास सुरु..
आरपीएफ कल्याणचे एएसआय राजकुमार भारती यांच्यासह कल्याण स्टेशनचे निरीक्षक एस एन मुंडे यांच्या टीमने या बॅगेची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यात हिरव्या रंगाचे गवतासारखे दिसणारा 20 किलो 780 ग्राम वजनाचा अमली पदार्थ ( गांजा) असल्याचे आढळून आले याची किंमत 2 लाख 7 हजार 800 इतकी असल्याचे आरपीएफकडून सांगण्यात आले. हा गांजा नारकोटिक्स विभागाला सुपूर्द करण्यात आला. हा गांजा कोणी आणि कुठून आणला आहे, याचा तपास सुरू आहे.