ठाणे - भिवंडी महापालिकेच्या २०१७ सालच्या निवडणुकीत काँग्रेसला मतदारांनी एकहाती सत्ता देत, ४७ नगरसेवकांना निवडून दिले होते. मात्र या निवडणुकीला अडीच वर्षातच फुटीर गटाने ग्रहण लावले. डिसेंबर २०१९ च्या महापौर पदाच्या निवडणुकीत १८ काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाशी दगाबाजी करीत भाजपा-कोर्णाक आघाडीला साथ दिली. त्यांनी भाजपा-कोर्णाक आघाडीच्या प्रतिभा पाटील यांच्या पारड्यात मतदान केले.
त्यानंतर काँग्रेसचे माजी महापौर जावेद दळवी यांनी पक्षांतर बंदी कायद्यान्वये त्या फुटीर १८ नगरसेवकांवर बडतर्फीच्या मागणीची तक्रार, कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे केली होती. यावर कोकण आयुक्तांपुढे १८ फेब्रुवारी २०२० रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश १८ फुटीर नगरसेवकांना दिले होते. मात्र त्यानंतर लॉकडाऊनमुळे या फुटीर गटावरीची टांगती तलवार लांबणीवर पडली. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक २०१७ च्या निवडणुकीत निवडून आला नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादीची पाटी कोरीच राहिली होती. पण आता फुटीरांचा गट राष्ट्रवादीच्या गळाला लागला आहे. ते कुठल्याही क्षणी नगरसेवक पद वाचविण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.
काँग्रेस-शिवसेना आघडीकडे बहुमत असूनही निवडणुकीत हार
२०१९ मध्ये महापौर पदासाठी काँग्रेसकडून रिषिका राका व भाजपा-कोणार्क विकास आघाडीच्या माजी महापौर नगरसेविका प्रतिभा पाटील या रिंगणात होत्या. या मतदान प्रक्रियेत कोणार्क विकास आघाडीसह आरपीआय, समाजवादी पक्ष व भाजप व फुटीरतावादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी प्रतिभा पाटील यांना मतदान केल्याने त्या ४९ मतांनी विजयी झाल्या. विशेष म्हणजे महापालिकेत काँग्रेसचे एकूण ४७ नगरसेवक असून त्यापैकी १८ नगरसेवक भाजपा कोणार्क विकास आघाडीकडे गेल्याने काँग्रेस उमेदवाराचा दारुण पराभव झाला. त्यामुळे काँग्रेस व शिवसेनेला सत्तेपासून पायउतार व्हावे लागले. तर उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही भाजपा व कोणार्क विकास आघाडीने पुरस्कृत केलेल्या काँग्रेसचे फुटीर नगरसेवक इम्रान खान यांना ४९ मते मिळाली. त्यांनी सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी यांचा पराभव केला होता. शिवसेनेचे चौधरी यांना ४१ मते मिळाली होती.
काँग्रेस-शिवसेना आघाडीची होती सत्ता
काँग्रेसने २०१७ मध्ये शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसने महापौरपद मिळविले होते. त्याबदल्यात काँग्रेसने सेनेला उपमहापौर पद दिले होते. २०१७ साली शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसने महापौर पद मिळवले होते. भाजपा व कोणार्क विकास आघाडीला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. याची सल भाजपा कोणार्क विकास आघाडीला होती. डिसेंबर २०१९ साली झालेल्या निवडणुकीत भाजपा कोणार्क विकास आघाडीने काँग्रेसच्या १८ नगरसेवकांना फोडून महापालिकेत सत्ता स्थापनकरून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीची वल्गना करणार्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना भिवंडीतून जोरदार धक्का दिला होता.
काँग्रेसच्या दोन गटाची एकमेकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज
२०१९ च्या महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्याने, काँग्रेस पक्षात गटबाजी उफाळून आल्याने बनावट पक्षादेश प्रकरणी दोन्ही गटातील नगरसेवक एकमेकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल करीत केले होते. त्यामुळे पोलिसही त्रस्त झाले असून लवकरच चौकशी करून कारवाई करणार असल्याचे पोलिसांकडून लॉकडाऊन पूर्वी सांगण्यात आले.
भिवंडीतील पक्षीय बलाबल
भिवंडी महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ९० जागांपैकी काँग्रेसने ४७ जागा मिळवून बहुमत संपादन केले होते. तर भाजपने २० शिवसेनेने १२, कोणार्क आघाडी व रिपब्लिकन पक्षाने प्रत्येकी चार, समाजवादी पक्षाला दोन आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आले होते.
हेही वाचा - वाहतूक कोडींवर तोडगा; वाहतूक पोलीस आणि ठाणे महापालिकेचा अॅक्शन प्लॅन
हेही वाचा - नवी मुंबई: मास्क वापरण्याकरता सेल्फी अभियानातून आम आदमी पक्षाची जनजागृती