ठाणे - दिल्लीतील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमासाठी भिवंडीतून काही नागरिक सहभागी झाल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 15 जणांनी दिल्लीहून ट्रेनने प्रवास केलाय. त्यातील नऊ जणांना दिल्लीत क्वारंटाईन करण्यात आले असून अन्य चौघांना भिवंडीतील क्वारंटाईन केंद्रात हलवण्यात आले आहे. मात्र, यातील दोघांचा अद्याप शोध लागला नसल्याची माहिती, भिवंडी मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयवंत धुळे यांनी दिली आहे.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध आणले आहे. मात्र यानंतरही दिल्लीत तबलिगी जमातीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये विदेशी नागरिकांसह देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यातील अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून यामुळे तेलंगाणात काही दगावले आहेत.
यातच भिवंडीसारख्या दाटीवाटीची वस्ती असलेल्या भागातूनदेखील 15 जणांनी उपस्थिती दर्शवली. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. भिवंडीत अद्याप एकही पॉझिटिव्ह आढळला नाही. मात्र, दिल्ली प्रवासातील नागरिकांमुळे या ठिकाणी कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या 15 जणांपैकी काहींनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता. तर काहींनी एकाच ट्रेनमधून प्रवास केल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच दिल्लीहून ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या अथवा तबलिगी कार्यक्रमात सहभागी झालेल्या अन्य दोघांचा अद्याप शोध सुरू आहे.