सोलापूर - स्मार्ट सिटीच्या कामाचा बोझा शहरवासियांना सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कासव गतीने चालू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामामुळे शहरातील नागरिक वैतागून गेले आहेत. जागोजागी खोदकाम आणि खड्डे केले आहेत. शेवटी आज बुधवारी युवक पँथरच्या कार्यकर्त्यांनी शहरातील सतनाम चौक येथील मोठ्या खड्ड्यात होमहवन (यज्ञ) करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.
स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत सोलापूर शहरातील प्रत्येक चौकात आणि गल्ली बोळात पाईप लाईन, ड्रेनेज लाईनसाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. रस्त्यावरील पाईप लाईनचे काम झाल्यानंतर रस्ता पूर्ववत केला जात नाही. सदर कामाची मुदत संपलेली आहे, तरीदेखील आजतागायत काम पूर्ण झाले नाही. या खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात वाढले आहेत आणि वाहनधारकांना पाठीचा त्रास, मणक्यांच्या त्रास जाणवू लागला आहे.
मुख्य रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य
ऐन सणासुदीच्या काळात शहरातील बाजारपेठांकडे जाणारे रस्ते या खड्ड्यांमुळे बंद झाले आहेत. तसेच मुख्य रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याबाबत पालिका प्रशासनाला वेळोवेळी तक्रार देऊनही काहीही कारवाई होत नाही. स्मार्ट सिटीच्या नियोजन शून्य व ढिसाळ कारभाराला कंटाळून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी व सद्सदविवेक बुद्धी यावी म्हणून युवक पँथरच्या वतीने 4 नोव्हेंबर रोजी लष्कर (दक्षिण सदर बझार) येथील खड्ड्यात बुधवारी दुपारी होमहवन (यज्ञ) करून आंदोलन करण्यात आले. यावेळी दीपक गवळी, विश्वास नागमोडे, शोभा गायकवाड, सुनिता गायकवाड, वसीम खान आदी उपस्थित होते.