सोलापूर - सोलापुरातील एका खासगी लॅबमध्ये काम करणाऱ्या महिलेस त्याच्याच नातेवाईकांनी लॅबमध्ये घुसून जबर मारहाण केली आहे. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पण गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी विलंब केला. तसेच मारहाण करणाऱ्या संशयितांना अद्यापही अटक केले नाही. एक महिला आणि एक पुरुष असे दोघांनी लॅबमध्ये घुसून मला मारहाण केल्याचे त्या महिलेने सांगितले आहे. हिना खान(वय 35,रा,लोकमान्य नगर सोलापूर) असे त्या महिलेचे नाव आहे. याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. मारहाण करणाऱ्या संशयितांना ताबडतोब अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी. घरगुती वादातून ही घटना घडली आहे, अशी माहिती त्या महिलेने दिली आहे.
घरगुती वादातून जबर मारहाण-
लॅबमध्ये काम करणारी महिला हिना मुश्ताक खान ही शुक्रवारी रोजच्या प्रमाणे सोलापूर शहरातील एका खासगी लॅबमध्ये काम करत होती. नात्यातील परवेज शेख(वय 45) आणि तंजीला शेख(25)(दोघे रा.लोखंडवाला कॉम्प्लेक्स,बेगम पेठ,सोलापूर) हे दोघे आले. आमची बदनामी का करते असा जाब विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली. परवेज आणि तंजीला या दोघांनी हिना खान याचे केस धरून हातापायाने मारहाण केली. त्याचे केस ओढत तिला बाहेर फरफटत घेऊन गेले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण-
परवेज शेख ही व्यक्ती बांधकाम ठेकेदार आहे. त्याला दोन मुली, एक मुलगा आणि एक पत्नी आहे. त्याने एका परस्त्रीसोबत लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सर्व नातेवाईकांना माहिती झाली आहे. ही बाब सर्व नातेवाईकांना हिना खान यांनी सांगितले असा आरोप परवेज शेख हा करत होता. गेल्या आठवड्यापासून तो हिना खानवर चिडुन तिला फोन करून धमकावत होता. शेवटी परवेज त्याची मुलगी तंजीला शेख हे दोघे शुक्रवारी सकाळी 11 ते 12 दरम्यान सोलापूर शहरातील गांधी नगर येथील खासगी लॅबमध्ये आले आणि आमची बदनामी करते का असा जाब विचारून मारहाण करू लागले. या मारहाणीत हिना खान या महिलेस हाताला आणि कानाला जखमा झाल्या आहेत.
सदर बाजार पोलीस ठाण्यात नोंद-
हिना खान या महिलेने जखमी अवस्थेत येऊन सदर बाजार पोलीस ठाण्यात माहिती सांगितली आणि तक्रार देण्याचा प्रयत्न केला. तसेच सीसीटीव्ही फुटेज दाखवले. यानुसार ठाणे अंमलदार यांनी भा.द.वि.323,504,34 प्रमाणे नोंद करून घेतली आहे. पण जखमी महिलेने माध्यमांना माहिती दिली की, सीसीटीव्ही फुटेज पाहून तरी योग्य गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसेच संशयित आरोपींना अटक करून त्यांवर कडक कारवाई करणे गरजेचे होते. पण पोलिसांनी तसे केले नाही. भविष्यात यांच्याकडून आपल्या जीवाला धोका आहे, असे तिने सांगितले. संशयित आरोपी अजूनही मोकाटच आहेत, त्यांना अटक करावी, अशी मागणी तिने केली आहे.