सोलापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने अनेक निर्बंध लागू केले आहेत. गणेशोत्सवावर देखील कोरोनाचे सावट आहे. गणेश विसर्जनवेळी सोलापुरात मोठा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात गर्दी होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने जागोजागी गणेश मूर्ती संकलन केंद्र स्थापन केले आहेत. तर सोलापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेत कृत्रिम विसर्जन कुंड स्थापन केले आहे. गणेश भक्त आपल्या कुटुंबासह या कृत्रिम कुंडात बाप्पाचे विसर्जन करत आहे.
सोलापुरातील भाजपा माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी कृत्रिमरित्या ट्रॅक्टरमध्ये विसर्जन कुंड तयार केले आहे. 14 ट्रॅक्टरच्या ट्रालीमध्ये पाण्याची व्यवस्था करून बाप्पाचे विसर्जन केले जात आहे. गेल्यावर्षी देखील अशीच व्यवस्था करण्यात आली होती. जवळपास 9 हजार गणेश मूर्ती संकलित करून हिप्परगा येथील एका मोठ्या विहिरीत बाप्पाचे विसर्जन करण्यात आल्याची माहिती जगदीश पाटील यांनी दिली आहे. यंदा देखील ट्रॅक्टरच्या माध्यमातून कृत्रिम विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहे. यंदा 11 ते 12 हजार गणेश मूर्ती या कृत्रिम विसर्जन कुंडात विसर्जित केल्या जाणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
महानगरपालिकेतर्फे देखील गणेश मूर्ती संकलन केंद्र
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्र उभे करण्यात आले आहे. नागरिकांचा देखील भरपूर प्रतिसाद मिळत आहे. संभाजी तलाव किंवा अन्य विहिरीवर गर्दी करू नये आणि महानगरपालिका केंद्राने दिलेल्या ठिकाणी गणेश मूर्ती संकलीत करावी, असे आवाहन महापौर, महानगरपालिका आयुक्त यांनी गणेश भक्तांन केले आहे.
सोलापुरात एक दिवसांची जमावबंदी
महानगरपालिका आयुक्तांनी अनंत चतुर्थीला एक दिवसाची शहरात जमावबंदी लागू केली आहे. सोलापुरातील सर्व दुकाने बाजारपेठ यांना एक दिवस बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फक्त अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे.
हेही वाचा - नियम पाळून निर्विघ्नपणे पार पडला उत्सव, कार्यकर्त्यांची मुंबई महापौरांकडे प्रतिक्रिया