सोलापूर - संस्थात्मक क्वारन्टाइन होणाऱ्या कुटुंबाच्या घरात चोरी करणाऱ्या दोन संशयित चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 4 लाख 60 हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर व त्यांच्या पथकातील पोलिसांना या प्रकराबाबत माहिती मिळाली. क्वारन्टाइन कुटुंबीयांकडे घरफोडी करणारा सराईत चोरटा सराफ बाजारात सोने विकण्यासाठी येणार असल्याचे पोलिसांना कळाले. त्यानुसार 24 ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेने सापळा लावला. आकाश महादेव उडानशिव सराफ बाजारात येताच गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या. कसून चौकशी केल्यानंतर त्याने विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची घरफोडी केल्याचे उघड झाले. त्याकडून 4 लाख 20 हजार रुपयांचा सोन्या चांदीचा मुद्देमाल चोरल्याचेही स्पष्ट झाले.
संशयित आरोपी आकाश उडानशिव हा सराईत चोरटा आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
आणखी एकजण ताब्यात
महिबूब बादशहा इस्माईल शेख हा चोरीचे सोने विक्रीसाठी नई जिंदगी येथील मौलाना आजाद चौक येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. महिबूब बादशहा येताच त्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केले. त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाइल आणि सोने असा 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
संबंधित कारवाई गुन्हे शाखेचे सुहास आखाडे,संजय काकडे, संतोष येळे, विजय वाळके, प्रविण मोरे आणि सह-कर्मचाऱ्यांनी केली.