सोलापूर - शहरातील काँग्रेसचे नेते व उद्योजक करण म्हेत्रे यांचे शनिवारी (दि. 15 मे) निधन झाले होते. शनिवारी पाचच्या सुमारास करण म्हेत्रे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यांची अंत्ययात्रा रविवारी (दि. 16 मे) सकाळी अकरा वाजता त्यांच्या राहत्या घरातून निघाली. सोलापूर शहरात कोरोनाचा संसर्ग पाहता पंधरा दिवस संचारबंदी वाढवली आहे. शहरात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. चार ते पाच व्यक्ती एका ठिकाणी दिसले की त्यांच्यावर कारवाई होत आहे. मात्र, करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेला हजारोंचा जनसमुदाय उसळला होता. सोशल डिस्टन्सिंचा पूर्ण फज्जा उडाला होता. ही बोलावलेली किंवा कोणी जमा केलेली गर्दी नव्हती.
पोलिसांची गर्दीसमोर बघ्याची भूमिका
पोलीस प्रशासनाने गर्दी समोर बघ्याची भूमिका घेतली. अंत्ययात्रेला फक्त 20 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. तरी देखील गर्दीचा मोठा लोंढा अंत्ययात्रेला उपस्थित होता. पोलिसांनी कुणाचीही अडवणूक केली नाही. या अंतयात्रेला पोलीसच सहकार्य करत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. सोलापुरातील जांबमुनी चौक, मौलाली चौक, लष्कर, सात रस्ता या मार्गावरून ही अंत्ययात्रा मोदी स्मशानभूमीत गेली.
काँग्रेसचे पदाधिकारीही या अंत्ययात्रेला होते उपस्थित
या अंत्ययात्रेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, जॉन फुलारे, हनुमंत सायबोळू, अंबादास करगुळे, गणेश डोंगरे, अब्राहम कुमार, यल्लाप्पा तूपदोळकर यांच्यासह हजारोंच्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते युवक, महिला अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
हेही वाचा - रमजान ईदनिमित्ताने गोरगरीब व कोविडग्रस्तांना मदत करा - मुस्लिम धर्मगुरू