सोलापूर - कंपनीत गुंतवणूक करा व मोठा किंवा डबल परतावा मिळवा, अशी थाप मारून नवी मुंबई पनवेल येथील विराट फ्युचर या कंपनीने सोलापुरातील नागरिकांची फसवणूक केली आहे. 34 लाख 47 हजारांचा अपहार केल्याचा गुन्हा विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. कामठा हरिदास सोनी (विराट फ्युचर कंपनीचे मालक) व मोहोळ येथील कंपनीचे प्रतिनिधी फजलोद्दीन फक्रोद्दीन डोंगरी याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
जरीना फिरोज पठाण (वय 45 रा टिळक नगर, सोलापूर) यांनी 10 ऑगस्टला रात्री विजापूर नाका पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे.15 सप्टेंबर 2018 ते 14 जानेवारी 2020 या कालावधीत हा गुन्हा घडला असल्याची नोंद झाली आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी, की कामठा सोनी व फजलोद्दीन डोंगरी यांनी सोलापुरातील नागरिकांना विराट फ्युचर या कंपनीमध्ये रकम गुंतवणूक करून मोठा मोबदला मिळवा किंवा डबल मोबदला मिळवा, असे आमिष दाखवत पैसे गुंतवण्यास भाग पाडले. टिळक नगर येथील जरीना पठाण या आमिषाला बळी पडत 10 लाख 15 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. तसेच त्यांसोबत इतर नागरिकांनीदेखील गुंतवणूक केली होती. सोलापुरातील वेगवेगळ्या हॉटेलात गुंतवणूक करण्याच्या बैठका झाल्या. जरीना पठाण यांना सप्टेंबर 2018 पासून सप्टेंबर 2019 पर्यंत गुंतवलेल्या 10 लाख 15 हजार पैकी फक्त 5 लाख 76 हजार रुपयांचा परतावा मिळाला. त्यानंतर सप्टेंबर 2019 नंतर विराट फ्युचर कंपनीने परतावा देण्यास बंद केले. त्याचबरोबर कंपनीने वेबसाईट देखील बंद केली.
कंपनीचे प्रतिनिधी फजलोद्दीन डोंगरी मोहोळ येथे राहवयास आहेत. गुणवणूकदारांनी त्या प्रतिनिधीस पैशांचा तगादा लावला. त्यावर फकरोद्दीन डोंगरी याने जरीना पठाण यांना उरलेल्या रकमेचा अॅक्सिस बँकेचा 3 लाख 25 हजार रुपयांचा व विजया बँकेचा 50 हजार रुपयांचा चेक दिला होता. परंतु, फकरोद्दीन डोंगरी यांच्या खात्यात रक्कम नसल्याने दोन्ही चेक बाऊन्स झाले. जरीना पठाण व त्यांच्या पतीने फकरोद्दीनकडे अधिक तगादा लावल्यानंतर फकरोद्दीन डोंगरी याने एका शंभर रुपयांच्या बॉण्डवर सही करून लिहून दिली आणि उरलेली 4 लाख 35 हजार रुपये रक्कम 28 फेब्रुवारी 2020 पर्यंत देतो, असे सांगितले. परंतु, मोहोळ येथील फकरोद्दीन डोंगरी व पनवेल येथील कामठा सोनी या दोन्ही आरोपींनी काहीही रक्कम परत न देता फसवणूक केली. उलट जरीना पठाण यांसोबत इतर नागरिकांना देखील विराट फ्युचर या कंपनीत 30 लाख 12 हजार रुपये गुणवणूक करण्यास लावून फसवणूक केली.
तक्रारदार जरीना यांचे 4 लाख 35 हजार व इतर नागरिकांचे 30 लाख 12 हजार असे एकूण 34 लाख 47 हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक केली आहे. याबाबत 10 ऑगस्टला रात्री विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक म्हस्के करत आहेत.